भुजबळांचा साखर कारखाना ताब्यात

By admin | Published: March 22, 2016 04:26 AM2016-03-22T04:26:25+5:302016-03-22T04:26:25+5:30

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने सोमवारी नाशिकमधील गिरणा साखर कारखाना आणि २९० एकर जमीन अशी ५५ कोटींची मालमत्ता ताब्यात घेतली

Bhujbal sugar factory | भुजबळांचा साखर कारखाना ताब्यात

भुजबळांचा साखर कारखाना ताब्यात

Next

डिप्पी वांकानी,  मुंबई
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने सोमवारी नाशिकमधील गिरणा साखर कारखाना आणि २९० एकर जमीन अशी ५५ कोटींची मालमत्ता ताब्यात घेतली. भुजबळ कुटुंबीयांनी ‘आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर’ या कंपनीद्वारे या कारखान्याची लिलावात खरेदी केली होती, असा ईडीचा आरोप आहे. ऋणवसुली प्राधिकरणाने २००९ मध्ये हा लिलाव केला होता.
ज्या कंपनीच्या माध्यमातून कारखाना घेण्यात आला ती कंपनी भुजबळ कुटुंबीयांची असून, महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून लाचेच्या रूपाने मिळालेला पैसा याच कंपनीत वळता करण्यात आला, असे ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले. गिरणा कारखाना लिलावाद्वारे खरेदी करण्यात आला. लिलाव प्रक्रियेतही गैरव्यवहार झाला असल्याचा संशय असून, त्याचा आम्ही तपास करत नाही आहोत, असे ईडीचा अधिकारी म्हणाला. भुजबळांच्या वतीने डमी कंपन्यांनीही बोली लावली होती. तथापि, सर्वात कमी बोली लावणाऱ्या आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला हा कारखाना देण्यात आला. ईडीने ताब्यात घेतलेल्या मालमत्तांची किंमत ढोबळ अंदाज व सरकारी दरानुसार ५५ कोटींच्या घरात आहे. तथापि, त्यांचे बाजारमूल्य आमच्या अंदाजाहून कितीतरी अधिक आहे, असे ईडीचे म्हणणे आहे. ईडीने कारखाना व हा कारखाना ज्या जमिनीवर उभा आहे ती जमीन ताब्यात घेतली असून, जप्तीच्या या कार्यवाहीची माहिती प्राधिकृत अधिकाऱ्याला ३० दिवसांच्या आत दिली जाईल. हा अधिकारी भुजबळ कुटुंबीयांकडे याबाबत स्पष्टीकरण मागेल आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरच या जप्तीबाबत निर्णय घेईल. त्यानंतरच आम्ही परिसर रिकामा करण्याची नोटीस बजावून या मालमत्तांचा ताबा घेऊन त्यांना सील ठोकणार आहोत, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
ईडीने यापूर्वी परवेश कन्स्ट्रक्शनची ११० कोटी रुपयांची सॉलिटेअर बिल्डिंग ताब्यात घेतली होती. समीर आणि पंकज भुजबळ गेल्या डिसेंबरमध्ये या कंपनीचे संचालक होते. तत्पूर्वी ईडीने याच प्रकरणात चमणकर इन्टरप्रायजेसची १७.३५ कोटी रुपयांची मालमत्ता हस्तगत केली होती. आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लि. ही खासगी कंपनी असून २२ नोव्हेंबर २००६ रोजी तिची स्थापना केली होती. पंकज भुजबळ, समीर भुजबळ आणि सत्यन अप्पा केसरकर हे संचालक असलेल्या या कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा ३० सप्टेंबर २०१५ रोजी घेण्यात आली होती. उद्योग व्यवहार मंत्रालयाकडील नोंदीनुसार, कंपनीने शेवटचा ताळेबंद ३१ मार्च २०१५ रोजी सादर केला होता. ३१ मार्चपर्यंत कोठडीत : छगन भुजबळ यांचे पुतणे समीर याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवण्याचा आदेश सोमवारी न्यायालयाने दिला. समीरला कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयात आणले होते.

Web Title: Bhujbal sugar factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.