भुजबळांना लवकरच मिळणार डिस्चार्ज
By admin | Published: April 24, 2016 03:05 AM2016-04-24T03:05:51+5:302016-04-24T03:05:51+5:30
माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्यामुळे लवकरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. भुजबळ यांच्या प्रकृतीच्या तपासणी अहवाल पाहता, त्यांना रुग्णालयात
मुंबई : माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्यामुळे लवकरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. भुजबळ यांच्या प्रकृतीच्या तपासणी अहवाल पाहता, त्यांना रुग्णालयात दाखल करून घेणे योग्यच असल्याचा अहवाल जे. जे. रुग्णालयातील ४ डॉक्टरांच्या समितीने सादर केला आहे. भुजबळ यांच्या हृदयाच्या ठोक्यांचे (हॉल्टर मॉनिटरिंग) निरीक्षण करण्यासही परवानगी दिली आहे.
१८ एप्रिल रोजी छगन भुजबळ यांना दातदुखी आणि छातीत दुखत असल्यामुळे सेंट जॉर्ज रुग्णालयात तपासणीसाठी आणले होते. त्या वेळी त्यांचा रक्तदाब वाढला असल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता होती का? याची चौकशी जे. जे. रुग्णालयातील ४ डॉक्टरांच्या स्थानिक चौकशी समितीने केली होती. या समितीला डॉ. रोहन सिक्वेरा यांनी सर्व माहिती दिली होती. तीन दिवसांनी आलेल्या समितीच्या अहवालात छगन भुजबळ यांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.
शनिवार, २३ एप्रिलला भुजबळ यांना सीटीस्कॅन आणि सोनोग्राफीसाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले होते. भुजबळ यांचा रक्तदाब नियंत्रणात आला आहे. त्याचबरोबर मधुमेहही नियंत्रणात आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांच्या हृदयाचे ठोके नियंत्रणात आले की नाहीत, हे तपासण्यासाठी ‘हॉल्टर मॉनिटरिंग’ करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
राहुल घुले यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
मुंबई : आर्थररोड कारागृहातून छगन भुजबळ यांच्या सुटकेसाठी डॉ. राजन घुले यांनी मदत केल्याच्या आरोपाला नाकारत घुले यांनी याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी आणखी एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.
एक जबाबदार वैद्यकीय अधिकारी म्हणून मी त्यांना या सर्व बांबींची वैद्यकीय तपासणी सेंट जॉर्ज रुग्णालयात करुन घेण्याबाबत सल्ला दिला. याची माहिती कारागृह अधिक्षक भारत भोसले यांनी लेखी स्वरुपात रजिस्टर क्रमांक ३२ मध्ये दिली. मुख्य वैद्यकीय अधिकारी त्यावेळी कारागृहात कर्तव्यावर हजर नव्हते. मात्र या प्रकरणाची कारागृह अधीक्षक भोसले यांना कल्पना होती.
भुजबळ यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात पाठविण्याचा निर्णय भोसले व मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोड यांचा होता. मी कागदोपत्री कोणतीही खाडाखोड केलेली नसल्याचे डॉ. घुले यांचे म्हणणे आहेआपल्यावरील आरोप खोटे असून याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी या मागणीसाठी त्यांनी आणखीन एक पत्र मुंख्यमंत्र्यांना लिहिले आहे. त्यात त्यांनी वरील बाबींचा नमूद केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यास आपण आझाद मैदान येथे उपोषणाला बसण्याचा इशाराही डॉ.घुले यांनी दिला आहे.