भुजबळांचे पाय खोलात!
By admin | Published: June 12, 2015 04:27 AM2015-06-12T04:27:38+5:302015-06-12T04:27:38+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यासह एकूण १७ जणांविरोधात गुन्हा नोंदविला.
मुंबई : महाराष्ट्र सदन बांधकामातील कोट्यवधींचा भ्रष्टाचार आणि अनियमिततेप्रकरणी गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यासह एकूण
१७ जणांविरोधात गुन्हा नोंदविला. गेल्या चार दिवसांमध्ये भुजबळ यांच्याविरोधात नोंद झालेला हा दुसरा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे.
या गुन्ह्यात भुजबळ पुत्र पंकज, पुतण्या समीर यांच्यासह सध्या औरंगाबादचे माहिती आयुक्त व बांधकाम विभागाचे माजी सचिव दीपक देशपांडे यांनाही आरोपी करण्यात आले आहे. परिणामी, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या अडचणींत भर पडली आहे. तशातच कालिना लायब्ररी प्रकरणात भुजबळांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवाला (एफआयआर)पाठोपाठ सक्त वसुली संचालनालय (ईडी) आता भुजबळ व इतरांविरुद्ध एनफोर्समेंट केस इन्फर्मेशन रिपोर्ट (ईसीआयआर) दाखल करणार आहे. त्यामुळे त्यांचे आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारही चौकशीच्या घेऱ्यात येणार आहेत. एसीबीने दाखल केलेल्या एफआयआरनुसार स्वत: छगन भुजबळ, पंकज, समीर, तसेच दीपक देशपांडेंसह विकासक कृष्णा चमणकर, त्यांचा मुलगा प्रसन्न, प्रविणा व प्रणिता या सुना, भुजबळ यांच्या एमईटीत कार्यरत असलेले संजय जोशी, त्यांच्या पत्नी गीता, तन्वर इस्माईल शेख, त्यांच्या पत्नी इरम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे(एमएसआरडीसी) निवृत्त मुख्य अभियंता अरुण देवधर, मुख्य अभियंता अनिलकुमार गायकवाड, बांधकाम विभागाचे निवृत्त सचिव देवदत्त मराठे, मुख्य वास्तुविशारद बिपिन संख्ये, बांधकाम विभागाचे माजी सचिव माणिक हिरामण शहा आदींचा आरोपींमध्ये समावेश आहे.
ईडीच्या मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले की, भुजबळांनी चेक्स आणि रोख स्वरूपात घेतलेल्या टक्केवारीतून (किकबॅक्स) मिळविलेली संपत्ती आणि त्यांच्याकडे आलेल्या पैशांचा मार्ग शोधणे हे आमच्या चौकशीचे क्षेत्र आहे. भुजबळ यांचा मुलगा आणि पुतण्या संचालक असलेल्या कंपन्यांमध्ये अतिशय जास्त दराने भाग (शेअर्स) घेण्यासाठी कोणी पैसा दिला, याचीही आम्ही चौकशी करणार आहोत. कंपनीने सिंगापूरमध्ये ३५-४० कोटी रुपये गुंतविले असून या रकमेची सक्त वसुली संचालनालय चौैकशी करणार आहे. आमची चौकशी ही केवळ बँक खात्यातील नोंदींपुरतीच (एन्ट्रीज) असणार नाही, तर जेवढी काही रक्कम मिळाली तिचीही चौकशी होईल, असे ईडीचे सहसंचालक सत्यब्रत कुमार यांनी सांगितले. आमच्या चौकशीचा मुख्य रोख हा हवालाचा व्यवहार यात झाला का, असा राहून त्यानुसार गुन्हा दाखल होईल. या गुन्ह्यासाठी तीन ते सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे, असे ते म्हणाले.
छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज व पुतण्या समीर संचालक असलेल्या आर्मस्ट्राँग इंजिनीयरिंग कंपनीने सिंगापूरमध्ये ठेवलेल्या पैशांबद्दल सारस्वत बँकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे ईडीने नोंदवून घेतले आहे. सिंगापूरला पैसे पाठविताना ‘फेमा’च्या (परकीय चलन व्यवस्थापन कायदा) नियमांचे काही प्रमाणात उल्लंघन झाले आहे. साधारण ३०-४० टक्के रक्कम परत भारतात पाठविण्यात आली. भारतात पाठविण्यात आलेली रक्कम हा संचालकांच्या पश्चात बुद्धीचा प्रकार दिसतो, असे कुमार यांनी सांगितले. सिंगापूरला पाठविण्यात आलेल्या एवढ्या मोठ्या रकमेची माहिती रिझर्व्ह बँकेला देण्यात आलेली नाही. या रकमेची माहिती रिझर्व्ह बँकेला देण्याची जबाबदारी कंपनीची आहे, असे सारस्वत बँकेच्या अधिकाऱ्यांनी कंपनीला सांगितले होते. आम्ही आमच्या जबाबदारीचे योग्य पालन केले आहे, असे बँकेचे अधिकारी म्हणाले. शेअर्सची किंमत मुळात जास्त नसतानाही ती मोठ्या प्रीमियमसाठी तशी दाखविण्यात आली, असे आम्हाला आढळले आहे. त्या शेअर्ससाठी कोणी पैसा पुरविला याची आम्ही चौकशी करणार आहोत, असे ते म्हणाले.