भुजबळांच्या ‘क्लीन चिट’वर बांधकाम मंत्र्यांची स्वाक्षरी !
By admin | Published: January 12, 2016 02:40 AM2016-01-12T02:40:58+5:302016-01-12T02:40:58+5:30
महाराष्ट्र सदनप्रकरणी सार्वजनिक बांधकाम खात्याने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना दिलेल्या ‘क्लीन चिट’ अहवालावर राज्याचे विद्यमान सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत
मुंबई : महाराष्ट्र सदनप्रकरणी सार्वजनिक बांधकाम खात्याने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना दिलेल्या ‘क्लीन चिट’ अहवालावर राज्याचे विद्यमान सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचीही स्वाक्षरी असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांप्रमाणेच राज्य सरकार आता पाटील यांचीही चौकशी करणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्र सदनाचे बांधकाम करण्याचा तत्कालीन मंत्रिमंडळ उपसमितीने घेतलेला निर्णय व त्यानंतर फायलींचा सुरू झालेल्या प्रवासाबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लिखित स्वरूपात विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना बांधकाम खात्याने नोव्हेंबर महिन्यातच एसीबीला आपला अहवाल पाठविला; परंतु त्याची चर्चा मात्र गेल्या महिन्यात करण्यात आली.
भुजबळ यांना महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणात ‘क्लीन चिट’ देणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या या अहवालावर बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सचिव आनंद कुलकर्णी व अन्य अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मात्र ही बाब उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारने लाचलुचपत विभागाला ‘क्लीन चिट’ अहवाल सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. या समितीच्या अहवालातही बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना दोषमुक्त केल्याचे मानले जात असून, ज्याप्रमाणे अधिकाऱ्यांची चौकशी केली, त्याचप्रमाणे या अहवालावर स्वाक्षरी करणारे मंत्री चंद्रकांत पाटील यांचीही चौकशी करणार काय, असा सवाल केला जात आहे.
भाजपाचे मंत्री खोटे बोलतात
नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ यांनी भाजपाचे मंत्री खोटे बोलतात, असा आरोप केला. महाराष्ट्र सदन व कलिना मध्यवर्ती ग्रंथालय या दोन्ही प्रकरणात आपला काहीही संबंध नाही हे वारंवार आपण सांगितले, तरीही खोटे-नाटे आरोप करून यात गुंतविण्याचा प्रयत्न झाला. अखेर सत्य बाहेर आले. यात सार्वजनिक बांधकाम खात्याचा व मंत्री म्हणून माझा काहीही संबंध नसल्याचा अहवाल विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनीच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला सादर केला आहे. त्यामुळे सरकार उघडे पडले, असेही भुजबळ म्हणाले.