भुजबळ कोठडीत; कार्यकर्ते रस्त्यावर
By Admin | Published: March 16, 2016 08:41 AM2016-03-16T08:41:09+5:302016-03-16T08:41:09+5:30
महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहारात माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना १७ मार्चपर्यंत सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावण्यात आली आहे.
- डिप्पी वांकाणी, मुंबई
महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहारात माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना १७ मार्चपर्यंत सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावण्यात आली आहे. भुजबळ यांना ईडीने अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. आर. भावके यांच्यासमोर हजर केले होते. त्यांना तीन दिवस कोठडी देण्यात यावी, अशी विनंती ईडीतर्फे करण्यात आली.
मात्र गरज असेल तेव्हा भुजबळ ईडी कार्यालयात गेले आहेत आणि यापुढेही जातील. त्यामुळे त्यांना कोठडीत ठेवण्याचे कारण नसल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला. त्यावर न्यायालयाने भुजबळ यांना दोन दिवसांची कोठडी सुनावली.
न्या. भावके यांनी आपणास काही सांगायचे आहे का? असे भुजबळ यांना विचारले असता त्यांनी न्यायालयासमोर १0 मिनिटे आपली बाजू मांडली. त्या वेळी ते अतिशय भावुक झाले होते. एका क्षणी तर त्यांना रडूच कोसळले. त्याच अवस्थेत ते म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार असलेल्या समितीने बांधकामाची कंत्राटे दिली होती. वस्तुस्थिती अशी आहे की महाराष्ट्र सदन आणि अंधेरीतील आरटीओच्या बांधकामातून सरकारचा फायदाच झाला आहे. चमणकर यांच्या एसआरएचा प्रस्ताव मंत्रिमंडळानेच मंजूर केला होता. आरटीओजवळ काही जमिनीवर अनधिकृत बांधकामे असल्याने त्याबाबत बैठका घेण्याच्या सूचना विलासरावांनीच मला दिल्या होत्या. प्रत्येक बैठकीच्या वेळी अर्थ, महसूल, नियोजन, गृह तसेच नगरविकास खात्यांचे अधिकारी उपस्थित असायचे. त्या व्यवहारात पारदर्शकता नसल्याचे आढळून आल्याने चमणकर यांना भरपाई देऊन दुसरा विकासक नेमण्यात यावा, अशी सूचना अधिकाऱ्यांनी केली होती. मात्र तो एसआरएचा प्रकल्प असल्याने तसे करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्याबदल्यात त्यांच्याकडून महाराष्ट्र सदन, हाय माउंट आणि आरटीओ कर्मचाऱ्यांची घरे बांधून घेण्यात आली. मी हे करून दाखवल्याबद्दल आणि सरकारचे पैसे वाचवल्याबद्दल विलासरावांनी भूमिपूजन समारंभात माझे कौतुकच केले होते. त्यामुळे चमणकर यांनी मला पैसे देण्याचे कारणच नव्हते वा नाही. चटई क्षेत्र देण्याचे काम माझ्या खात्याचे नव्हे, तर नगरविकास आणि एसआरए यांचे होते. चमणकर यांच्याकडून चटई क्षेत्राच्या बदल्यात सरकारने अनेक प्रकल्प पूर्ण करून घेतले आहेत. मात्र, भुजबळ हेच ८८७ कोटी रुपयांची ‘निर्मिती’ करण्यामागे मुख्य सूत्रधार आहेत. तसेच हा पैसा भुजबळांचा पुतण्या समीर आणि मुलगा पंकज यांनी स्थापन
केलेल्या अनेक कंपन्यांमध्ये घालण्यात आला आणि कोट्यवधी रुपये कातड्यांच्या पिशव्यांमध्ये ठेवण्यात आले आणि छगन भुजबळ अध्यक्ष असलेल्या मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या (एमईटी) कार्यालयात नोटा मोजण्याच्या यंत्रावर हा पैसा मोजण्यात आला, असा दावा ईडीने केला.
एमईटीच्या वांद्रे येथील कार्यालयात संपूर्ण पैसा आणण्यात आला आणि हवालामार्गे व्यवहार करण्यासाठी पाठविण्यात आला. एमईटीचा माजी कर्मचारी अमित बिराज याने दिलेल्या जबानीनुसार नवव्या मजल्यावरील कार्यालयात नोटांनी भरलेल्या दोन मोठ्या बॅगा आणल्याचे आपण पाहिले होते. नोटा मोजण्याच्या यंत्रावर त्या मोजून नंतर त्या एमईटीच्या कार्यालयातील रोख रकमेच्या खोलीत त्या ठेवण्यात आल्या. त्या नोटा एक हजार रुपयांच्या होत्या आणि प्रत्येक बॅगेत अंदाजे एक कोटी रुपये असावेत. मी अनेकदा समीर त्याच्या सहकाऱ्यांना काही लोक रोख रक्कम एमईटी इमारतीत आणणार असल्याच्या सूचना देताना ऐकले होते, असेही अमित बिराज याने सांगितल्याची माहिती ईडीने न्यायालयात दिली. मात्र बिराज हा नाराज कर्मचारी होता, त्याने नंतर नोकरी सोडली आणि ती सोडताना अनेक कर्मचारीही आपल्यासोबत नेले, असा दावा भुजबळ यांनी केला.
ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयास सांगितले की, एमईटीचे अध्यक्ष असतानाही कार्यालयात एवढ्या मोठ्या रकमेचा व्यवहार झाल्याची माहिती तुम्हाला कशी नाही, यासारख्या प्रश्नांची उत्तरे भुजबळ यांनी दिली नाहीत. भुजबळांनीच स्थापन केलेल्या बनावट कंपन्यांचे संचालक बनविण्यात आलेल्या त्यांच्या माजी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या कबुलीची माहिती भुजबळांना देण्यात आल्यावर त्याबद्दलही काही माहिती असल्याचे त्यांनी
नाकारले. समीर आणि भुजबळ
यांना समोरासमोर आणायचे
असल्याने भुजबळांची कोठडी आवश्यक आहे.
माजी कर्मचाऱ्यांनी जी कबुली दिली आहे त्याविषयीही त्यांच्याकडे विचारणा करायची आहे. भुजबळ सध्या ज्या सॉलिटेयर इमारतीत राहतात, ती परवेश कन्स्ट्रक्शन्सने खरेदी केली आहे. परंतु मूळ जमीन मालकाला काहीही दिलेले नाही. त्यामुळे मालकीचा मुद्दा वादग्रस्त आहे. परंतु भुजबळांना याबद्दल विचारले असता त्यांनी एकही शब्द उच्चारलेला नाही. भुजबळ पैशांचा स्रोत सांगत नाहीत आणि ज्या कंत्राटदारांना ठरवून कंत्राटे दिली त्यांच्याशी तुमचा संबंध काय याबद्दल चकार शब्दही सांगत नाहीत. तसेच तुमच्याकडे कोणतेही खाते नसताना तुम्ही बैठका का घेतल्या याबद्दलही त्यांनी काही सांगितलेले नाही. भुजबळांना कोठडी देण्यात यावी अशी मागणी करणाऱ्या अर्जात ईडीने म्हटले आहे की के. एस. चमणकर एंटरप्रायजेसने ६.०३ कोटी रुपये ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चरला दिले आणि नंतर उप कंत्राटदार प्राईम बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनेही १८.५० कोटी रुपये त्या खात्यात जमा केले. चमणकरांचे भागीदार प्राईम बिल्डर्सकडून भुजबळांच्या नियंत्रणाखाली असलेल्या संस्थांमध्ये वळता केलेला पैसा हा महाराष्ट्र सदन आणि आरटीओ प्रकल्पाचे कंत्राट मंजूर करण्यासाठीच दिला होता.
त्यावर भुजबळांचे वकील प्रसाद ढाकेफळकर यांनी न्यायालयाला सांगितले की एखादी गोष्ट माहीत नाही, असे सांगितले म्हणजे असहकार्य केले असा अर्थ होत नाही. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (एसीबी) त्यांची संपूर्ण चौकशी पूर्ण केली आहे व भुजबळांना आपल्या ताब्यात ठेवावे असे त्यांना वाटलेले नाही, ही बाब भुजबळांचे वकील प्रसाद ढाकेफळकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. अगदी पहिल्या नोटिशीनुसार भुजबळ चौकशी यंत्रणेसमोर उपस्थित झाले आणि जेव्हा केव्हा बोलावले जाईल त्या वेळी उपस्थित राहण्याची त्यांची तयारी आहे. भुजबळांना कोठडीत न घेताही त्यांना कोणाच्याही समोरासमोर आणता येईल, असेही अॅड. ढाकेफळकर म्हणाले.
बनावट संचालक दाखवलेले एमईटीतील कर्मचारी...
संजय जोशी (अकाऊंटन्ट)- संचालक, ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चर, तन्वीर शेख (ट्रस्टींचे कार्यकारी सहायक)-संचालक , निश इन्फ्रास्ट्रक्चर, गीता जोशी (एमईटीतील अकाऊंटन्टची पत्नी)- संचालक, निश इन्फ्रास्ट्रक्चर, निमेश बेंद्रे (संपर्क अधिकारी)-परवेश कन्स्ट्रक्शन्स, राजेश धारप ( कारकून) - देविषा इन्फ्रास्ट्रक्चर, नितीन शाहू (ट्रस्टींचे कार्यकारी सहायक) - भावेश बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड, व्हर्च्युल टूर इंडिया, ग्रोथ इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, इम्रान शेख (तन्वीर यांच्या पत्नी)- ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चर,
दीपक शिंदे (परवेश कन्स्ट्रक्शन्सचा अकाऊटंट)- दीपम इन्फ्रास्ट्रक्चर, यशोधन इन्फ्रास्ट्रक्चर, सत्यम अप्पा कासेकर (कौटुंबिक मित्र) परवेश कन्स्ट्रक्शन्स, देविषा इन्फ्रास्ट्रक्चर, भावेश बिल्डर्स,व्हर्च्युल टूर इंडिया, आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर, सुधीत साळसकर (एमईटीचा माजी कर्मचारी)- आनंदवन इन्फ्रास्ट्रक्चर, यशोधन इन्फ्रास्ट्रक्चर, अमित बिराज (ट्रस्टींचे सहायक)- देविषा इन्फ्रास्ट्रक्चर, दिलीप नायक (ड्रायव्हर)- ग्रोथ इन्फ्रास्ट्रक्चर, यज्ञ इन्फ्रास्ट्रक्चर.
चोहोबाजूंनी कठडे : मंगळवारी सत्र न्यायालय परिसरात चौहोबाजूंनी कठडे उभारून पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. या खटल्याशी ज्यांचा संबंध नाही, अशांना न्यायालय परिसर सोडण्यास सांगण्यात यावे, अशी विनंतीही पोलीस उपायुक्त मनोज शर्मा यांनी न्यायाधीशांना केली होती.
औषधे घेण्यास परवानगी
भुजबळ यांना हृदयाचा त्रास आणि थकवा असल्याचे
त्यांच्या वकिलांनी सांगितल्यानंतर कोर्टाने ईडीच्या कोठडीदरम्यान भुजबळ यांना औषधे घेण्याची परवानगी दिली आहे. समीर भुजबळ यांना घरचे जेवण द्यायचे की नाही, याचा निर्णय न्यायालय बुधवारी देणार आहे.
वैद्यकीय तपासणी : मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास भुजबळ यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. त्यांच्या आरोग्य तपासणीचा अहवाल सर्वसामान्य असल्याची माहिती सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जे. बी. भवानी यांनी ‘लोकमत’ला दिली. रक्तदाबासह इतर चाचण्या घेण्यात आल्या.
राज्यभरात निदर्शने, रास्तारोको
मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईसह राज्यभरात रस्त्यावर उतरून भुजबळ यांच्या अटकेचा निषेध केला.
मुंबई शहर व उपनगरात सात ठिकाणी आंदोलन करण्यात आले. २०० कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन रात्री उशिरा त्यांची सुटका केली.
नाशिकसह जिल्ह्यात मालेगाव, येवला, सटाणा, कळवण, लासलगाव, नांदगावमध्ये कार्यकर्त्यांनी रास्तारोको केला.
खान्देशात धुळे, जळगावात निदर्शने करण्यात आली.
कोल्हापुरात पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला होता.
साताऱ्यातही आंदोलन झाले. सांगोल्यात समता परिषदेतर्फे मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले.
पुणे, अहमदनगरमध्ये मोर्चा काढण्यात आला.
विदर्भात नागपूर, अमरावती, चंद्रपूर, वर्ध्यात ठिकठिकाणी निदर्शने झाली.
अटक सूडबुद्धीने, विरोधकांचा हल्लाबोल
भुजबळांच्या अटकेचे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत जोरदार पडसाद उमटले. भुजबळ यांना ईडीने सूडबुद्धीने अटक केल्याचा आरोप करीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी आज विधानसभा अक्षरश: डोक्यावर घेतली. प्रचंड गदारोळामुळे कामकाज चारवेळा तहकूब करण्यात आले. तर अध्यक्षांनी स्थगन प्रस्ताव नाकारल्याने विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकला.
राष्ट्रवादी पाठीशी!
भुजबळांची अटक राजकीय सुडापोटी झाली आहे काय, या प्रश्नावर तूर्त मी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही, मात्र राष्ट्रवादी पक्ष भुजबळांच्या पाठीशी उभा असून कायदेशीर मार्गाने ही लढाई आम्ही लढू आणि या प्रक्रियेत भुजबळांना अंतत: न्याय मिळेल, याची मला खात्री आहे.
- शरद पवार
घोटाळेबाजांना सोडणार नाही - मुख्यमंत्री : आपले सरकार कोणाविरुद्ध सुडाच्या भावनेने वागणार नाही, पण घोटाळ्यांमध्ये अडकलेल्या घोटाळेबाजांना सोडणारही नाही. - देवेंद्र फडणवीस