हॉस्पिटलमधून भुलीच्या औषधांची तस्करी?

By admin | Published: August 24, 2016 01:59 AM2016-08-24T01:59:04+5:302016-08-24T01:59:04+5:30

ग्लोबल हॉस्पिटलच्या वरिष्ठ नर्सिंग अधिकाऱ्याला भुलीचे औषध चोरी केल्याप्रकरणी रंगेहाथ अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Bhuji drug smuggling from hospital? | हॉस्पिटलमधून भुलीच्या औषधांची तस्करी?

हॉस्पिटलमधून भुलीच्या औषधांची तस्करी?

Next


मुंबई : भुलीचे औषध देऊन सहा जणांची हत्या करणाऱ्या वाईतील संतोष पोळचे प्रकरण चर्चेत असतानाच, राज्यात विस्तारलेल्या ग्लोबल हॉस्पिटलच्या वरिष्ठ नर्सिंग अधिकाऱ्याला भुलीचे औषध चोरी केल्याप्रकरणी रंगेहाथ अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. त्याच्याकडून तब्बल ८ बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहे. बॉज जोसेफ (२८) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. या बाटल्यांचा वापर तो कशासाठी करत होता, याचा शोध भोईवाडा पोलीस घेत आहेत. या औषधांची तो तस्करी करत असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला जात आहे.
गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून तो ग्लोबल हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. सोमवारी रात्री आठच्या सुमारास तो रुग्णालयातून निघाला, तेव्हा भूल देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या बाटल्या कमी असल्याचे त्याच्या वरिष्ठांच्या लक्षात आले. त्यांनी सुरक्षा रक्षकाला जोसेफला थांबविण्यास सांगितले. त्याच्या अंगझडतीत २० मिलीच्या आठ बाटल्या सापडल्या. बाजारभावाप्रमाणे एका बाटलीची किंमत ३६३ रुपये आहे. औषधांच्या दुकानात हे औषध उपलब्ध होत नाही. केवळ नोंदणीकृत रुग्णालयांना हे औषध देण्यात येते.
भोईवाडा पोलिसांनी याबाबत जोसेफकडे विचारणा केली असता, या बाटल्या आपल्याकडे सुरक्षित ठेवत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र याचा वापर तो स्वत:साठी करत होता की या औषधांची तस्करी करत होता. याचा शोध पोलीस घेत आहेत. जोसेफच्या मानसिक स्थितीबरोबरच त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमीही तपासण्यात येत आहे. याप्रकरणी चोरीच्या गुन्ह्यात जोसेफला अटक केली असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती भोईवाडा
पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक तानाजी सुरुलकर यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Bhuji drug smuggling from hospital?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.