भूमाता ब्रिगेडच्या महिलांचा आरोपीला चोप
By admin | Published: February 7, 2017 10:00 PM2017-02-07T22:00:27+5:302017-02-07T22:00:27+5:30
सॉफ्टवेअर इंजिनीअर रसिला राजू ओ पी हिचा खून करणाऱ्या सुरक्षारक्षकाला भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी भर न्यायालयात चोप दिला
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 7 - हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीतील सॉफ्टवेअर इंजिनीअर रसिला राजू ओ पी हिचा खून करणाऱ्या सुरक्षारक्षकाला भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी भर न्यायालयात चोप दिला. बंदोबस्तावरील पोलिसांनी त्याला तातडीने बाजूला नेले. पोलिसांनी तृत्पी देसाई व त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेऊन सायंकाळी सोडून दिले.
भाबेन भराली सैकिया या सुरक्षारक्षकाची पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपत असल्याने त्याला पोलिसांनी दुपारी न्यायालयात आणले होते. त्यावेळी अधिक तपासासाठी त्याला २ दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी पक्षातर्फे करण्यात आली होती. यास बचाव पक्षातर्फे अॅड. बी. ए. आलुर, अॅड. तौसिफ शेख आणि अॅड. साजिद शाह यांनी विरोध केला. पोलिसांचा तपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे सैकिया याला पोलीस कोठडी देण्याची गरज नाही, असे बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर न्यायालयाने सैकिया याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
न्यायालयाच्या निर्णयानंतर दुपारी चारच्या सुमारास पोलीस त्याला घेऊन नव्या इमारतीच्या बाहेर आले. तोपर्यंत भूमाता ब्रिगेडच्या महिला कडेला दबा धरून बसल्या होत्या. तो बाहेर येताच या महिलांनी धावत जाऊन पोलिसांच्या मध्ये असलेल्या भाबेन याला मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी त्याच्याभोवती कडे करून पुन्हा मागे घेऊन गेले. त्यानंतर काही महिला बाजूला गेल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्याला धावतच बाहेर नेण्यास सुरुवात केली. तेव्हा आणखी दोन-तीन महिलांनी त्याला अडवून चोप दिला. तृप्ती देसाई यांच्यासमवेत मनीषा टिळेकर, रंजना कांबळे, ख्वाजा बी मोमीन, प्रज्ञा जगताप, मंजिरी चौधरी या सहभागी झाल्या होत्या.
याविषयी बोलताना तृप्ती देसाई यांनी सांगितले की, गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही़ आमचा कायद्यावर विश्वास आहे. पण कोपर्डी प्रकरणात आरोपींना सहा महिन्यात शिक्षा होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्याला सहा महिने उलटूनही अजून शिक्षा झालेली नाही. पोलिसांनी आधीच खबरदारी घेतली असती तर ही घटना घडली नसती. आरोपींमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी ही ताईगिरी सुरू केली आहे. राज्यात जेथे जेथे अशा घटना घडतील तेथे भूमाताच्या रणरागिणी अशा गुन्हेगारांवर दहशत बसविणार आहे. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी हिंजवडीत आज वॉक विथ पोलीस सुरु केला आहे़ आम्ही त्यांना शहरातील अनेक अवैध धंदे दाखवून देण्यास तयार आहोत, त्या आमच्याबरोबर वॉक करतील का, असा प्रश्न देसाई यांनी उपस्थित केला आहे. न्यायालयातील पोलिसांनी आरोपीला मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल या महिलांना ताब्यात घेतले व काही वेळाने सोडून दिले़