पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमिपूजन संपन्न
By Admin | Published: December 24, 2016 03:00 PM2016-12-24T15:00:32+5:302016-12-24T15:11:19+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमिपूजन पार पडलं आहे. यावेळी राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेदेखील उपस्थित होते.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमिपूजन पार पडलं आहे. यावेळी राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेदेखील उपस्थित होते. नौदलाच्या हॉवरक्राफ्टमधून सर्वांना भूमिपूजनाच्या ठिकाणी नेण्यात आलं. तब्ब्ल 3600 कोटी खर्च करुन अरबी समुद्रात जागतिक दर्जाचं शिवस्मारक उभारलं जाणार आहे. अरबी समुद्रातील 16 हेक्टर आकाराच्या खडकावर शिवस्मारक साकारण्यात येणार आहे. स्मारकासोबत शिवकालीन इतिहास आणि अनेक अद्यायावत सुविधा याठिकाणी असतील .गेली अनेक वर्ष रखडलेलं स्मारकाचं काम आता भूमिपूजनानंतर अखेर सुरु होईल.
स्मारकाच्या भूमिपूजनासाठी राज्यातील गडकिल्ले आणि शिवचरित्राशी संबंधित जिल्ह्यातून मातीचे कलश आणि सर्व नद्यांचे जलकलश शुक्रवारी मुंबईत दाखल झाले होते. हे सर्व कलशही यावेळी मान्यवरांकडे सुपूर्द करण्यात आले.
भूमिपूजनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सेबीच्या कार्यालयात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केटचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी ३.३० च्या सुमारास बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर मेट्रो, उन्नत रेल्वेमार्ग आणि ट्रान्सहार्बर मार्ग प्रकल्पाचे उद्घाटन करणार असून त्यानंतर जाहीर सभा पार पडणार आहे.
यानंतर नरेंद्र मोदी पुण्यातदेखील जाणार असून त्या ठिकाणी मेट्रो प्रकल्पाचं भूमिपूजन होणार आहे. मुंबईप्रमाणे पुण्यातदेखील श्रेयवाद सुरु असून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आधीच पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते भुमिपूजन करुन घेतलं आहे. त्यानंतर आज शनिवारी पंतप्रधानांच्या हस्ते हे भूमिपूजन होणार आहे. काँग्रेसने विरोध केला असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा
दुपारी १२ च्या सुमारास पनवेल येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्यूरिटीज् मॅनेजमेंटचे उद्घाटन.
दुपारी २.३० च्या सुमारास अरबी समुद्रातील स्मारकाचे जल व भूमिपूजन
दुपारी ३.३० च्या सुमारास बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर मेट्रो, उन्नत रेल्वेमार्ग आणि ट्रान्सहार्बर मार्ग प्रकल्पाचे उद्घाटन आणि त्यानंतर जाहीर सभा.
सभेनंतर पुणे मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पुण्याकडे रवाना.