रायगड संवर्धन प्रकल्पाचे भूमिपूजन महिन्याभरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2017 05:08 AM2017-06-07T05:08:34+5:302017-06-07T05:08:34+5:30
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होत आहे, ही आनंदाची बाब आहे
संदीप जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
महाड : अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होत आहे, ही आनंदाची बाब आहे. तथापि महाराजांचे जिवंत स्मारक असलेले गडकिल्ले जतन करण्याचे काम प्रथम झाले पाहिजे. किल्ले रायगड संवर्धन आराखड्यासाठी ६०६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातील १२५ कोटी रुपये प्रत्यक्षात रायगड संवर्धनासाठी वापरण्यात येणार आहेत. याच महिन्यात शिवभक्तांच्या उपस्थितीत रायगड संवर्धन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येईल, अशी घोषणा खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी केली.
भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने, किल्ले रायगडावर मंगळवारी ३४४ वा राज्याभिषेक सोहळा लाखो शिवभक्तांच्या साक्षीने संपन्न झाला. त्या वेळी संभाजीराजे बोलत होते. सोहळ्याला विजय शिवतारे, युवराज शहाजीराजे भोसले, महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, कोकण विभागाचे माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
किल्ले रायगडच्या संवर्धनामध्ये शिवभक्तांनी वर्षातून दोन दिवस श्रमदान करून योगदान द्यावे, असे आवाहन खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांबरोबर राजकारण करू नका. सर्वांनी एकत्र या आणि कर्ज काढून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा, असे आवाहन त्यांनी केले. कर्जमाफी करताना अन्य भूधारकांनाच लाभ मिळाला पाहिजे. बहुजन समाजाला आरक्षण देण्याचे पहिले काम छत्रपती शाहू महाराजांनी केले होते. आता सकल मराठा समाजाने एकसंध होऊन आरक्षणाची मागणी लावून धरली पाहिजे. वेळ वाया जाऊ देऊ नका, असे ते म्हणाले.
माजी कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी रायगड संवर्धन आराखड्याची माहिती देताना, शिवसमाधी, जगदीश्वर मंदिर, राजदरबार, राजवाडा, सप्तमंदिर आणि जिजाऊ समाधी या ठिकाणची कामे सुरू करण्यात येणार आहेत. प्रकल्पाचे काम जलदगतीने व्हावे यासाठी राज्य सरकारने हे काम आपल्याकडे घेतले आहे. शासनाने ३० अभियंते यासाठी नियुक्त असून, त्यांना पुरातत्व विभागाकडून प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी प्रास्ताविक केले. तारखेनुसार साजरा होणारा शिवराज्याभिषेक आता खऱ्या अर्थाने लोकोत्सव झाला आहे, असे त्यांनी सांगितले. शिवभक्तांचे मत विचारात घेऊनच रायगडचे संवर्धन करण्यात येईल, त्यासाठी कोणता संकल्प सोडण्याची आम्हाला आवश्यकता नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.
>पालखी मिरवणूक : छत्रपती संभाजी महाराज यांचे मार्गदर्शन झाल्यानंतर, राजसदरेपासून जगदीश्वर मंदिरापर्यंत भव्य अशी पालखी मिरवणूक काढली. विनहेरे येथील सासनकाठी या मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरली. या वेळेस पुणे येथील ढोल-ताशांनी या मिरवणुकीची रंगत वाढविली.
>पहाटे ध्वजारोहण सोहळा
मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता नगारखान्यासमोर भगवा ध्वजारोहण करून सोहळ्याला प्रारंभ झाला. सकाळी ६ वाजेपासून राजसदरेवरील कार्यक्र मांना प्रारंभ झाला. ९.३0 वाजता युवराज छत्रपती संभाजी राजे यांचे राजसदरेवर आगमन झाले. त्यानंतर छत्रपती घराण्याच्या राजपुरोहितांच्या मंत्रोच्चारात छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते शिवरायांच्या उत्सव मूर्तीवर अभिषेक, सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात आला.