१०५ वर्षापासून रखडलेल्या पंढरपूर-लोणंद रेल्वे लोहमार्गाचे रविवारी भूमिपूजन
By admin | Published: June 9, 2017 07:56 PM2017-06-09T19:56:12+5:302017-06-09T19:56:12+5:30
-
आॅनलाइन लोकमत सोलापूर
अकलूज : पंढरपूर-लोणंद या महत्वकांक्षी लोहमार्गाचे भूमिपूजन रविवार दि. ११ जून रोजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली. खा. मोहिते-पाटील यांनी यासाठी विशेष पाठपुरावा केल्याचे हे यश आहे.
ब्रिटिश काळात सन १९१२ साली हा लोहमार्ग मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी हा लोहमार्ग तब्बल १०५ वर्षे रखडला आहे. माजी राज्यसभा सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी हा मुद्दा चव्हाट्यावर आणला होता. त्यानंतर खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी गत तीन वर्षांपासून यासाठी सतत पाठपुरावा केला होता. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी खा. मोहिते-पाटील यांचे निकटचे संबंध या प्रकल्पाच्या पूर्णत्वाच्या कामी आले आहेत.
सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभास खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना बोलावून या रेल्वेमार्गाविषयी विनंती केली होती. त्यानंतर तीन महिन्यांनी सादर झालेल्या अर्थसंकल्पात ११४९ कोटी मंजूर करून चालू अर्थीक वषार्साठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली. रविवार दि.११ रोजी या रेल्वेमार्गाच्या कामांचे भूमिपूजन कराड येथे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे भूमिपूजन होणार आहे.
----------------------
१०९ कि.मी.साठी तब्बल १०५ वर्षांची प्रतिक्षा
हा रेल्वेमार्ग एकूण १४५ किमीचा असून त्यातील फलटणपर्यंतचे ३४ किमीचे काम झाले आहे. उर्वरित १०९ किमीच्या कामांसाठी तब्बल १०५ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. आता त्याचे भूमिपूजन होणार असल्याने हा लोहमार्ग पूर्ण होण्याचे निश्चित आहे. यासाठी ३२७ हेक्टर जमिनीचे संपादनही केव्हाच झाले आहे.
----------------
दुग्ध-शर्करा योग
१२ जूनला खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांचा वाढदिवस आहे. त्याच्या एक दिवस आगोदर ते पाठपुरावा करत असलेल्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन आहे. असा दुग्ध-शर्करा योग योगायोगाने जुळून आलेला आहे.