‘रेल्वेमार्गाचे सहा महिन्यांत भूमिपूजन!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2016 01:17 AM2016-11-06T01:17:20+5:302016-11-06T01:17:20+5:30
मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाकरीता संपूर्ण निधीची तरतूद झाली असून सहा महिन्यांच्या आत त्याचे भूमिपूजन करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय रस्तेवाहतूक व जहाजबांधणी
धुळे/नंदुरबार : मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाकरीता संपूर्ण निधीची तरतूद झाली असून सहा महिन्यांच्या आत त्याचे भूमिपूजन करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय रस्तेवाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे केली.
नागपूर-सुरत व धुळे-औरंगाबाद या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांच्या चौपदरीकरण कामाच्या भूमिपूजनाचा येथील पोलीस कवायत मैदानावर कार्यक्रम झाला. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे महाराष्ट्र हद्दीवरील बेडकी ते फागणे या १४१ कि.मी.च्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामाचे भूमिपूजनही त्यांनी केले. रेल्वे व जहाज बांधणी मंत्रालयांद्वारे १० हजार कोटी रुपये खर्चून रेल्वे मार्गाची उभारणी केली जाईल. जहाज मंत्रालयास झालेल्या ६ हजार कोटी रुपयांचा नफ्यापैकी ५ हजार कोटी रुपये या फायद्याचा ठरणाऱ्या रेल्वे मार्गासाठी दिल्याचे गडकरींनी स्पष्ट केले. आधी या मार्गाचा ५० टक्के खर्च रेल्वे करेल व उर्वरीत ५० टक्के खर्च मध्य प्रदेश व महाराष्ट्राने करायचा, असे ठरले होते. परंतु मध्य प्रदेश सरकारने याबाबत असमर्थता दाखविली होती. देशातील १११ नद्यांवर जलमार्ग उभारले जाईल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
‘या’ मार्गांचे काँक्रीटीकरण
धुळे-औरंगाबाद व नागपूर-सुरत या दोन्ही महामार्गांच्या चौपदरीकरणासह दोंडाईचा-मालेगाव, शेवाळी-निजामपूर-नंदुरबार-अक्कलकुवा, शहादा-मोहोल- कसाठे, साक्री-सटाणा-चांदवड, मनमाड-अहमदनगर-बीड या मार्गांच्या काँक्रिटीकरणाची घोषणा गडकरी यांनी केली. कामाचा आराखडा तयार करण्याचे आदेश संबंधितांना सांगितले़
विधानसभा क्षेत्रात ‘ड्रायव्हिंग स्कूल’
देशात २२ लाख प्रशिक्षित वाहन चालकांची आवश्यकता असून लवकरच देशातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात ‘ड्रायव्हिंग स्कूल’ देण्याची घोषणा गडकरी यांनी नवापुरात केली. वाहन चालकांना परवाना, फिटनेस व पोल्युशन फ्री प्रमाणपत्र देण्यासाठी प्रत्येक ड्रायव्हिंग स्कूल देण्याची योजना लवकरच अंमलात येणार असल्याचे ते म्हणाले.