भुसारींचा राजीनामा की हकालपट्टी?
By admin | Published: July 11, 2017 05:32 AM2017-07-11T05:32:44+5:302017-07-11T05:32:44+5:30
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश संघटन मंत्री रवींद्र भुसारी यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
यदु जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतीय जनता पार्टीचे प्रदेश संघटन मंत्री रवींद्र भुसारी यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यामुळे भाजपा पक्ष संघटनेत खळबळ उडाली असून मुख्यमंत्री, पक्षाचे मंत्री आणि आमदार-खासदारांच्या नाराजीमुळे भुसारी घरी गेले, अशी चर्चा आहे.
भाजपामध्ये संघटन मंत्रीपद हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. भुसारी यांचा उल्लेख पक्षामध्ये ‘रवीजी’ असा केला जात असे. जुलै २०११मध्ये त्यांची प्रदेश संघटनमंत्री पदावर नियुक्ती करण्यात आली होती. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक असून त्यांना संघाने भाजपात पाठवून महत्त्वाची जबाबदारी सोपविली होती. भाजपामध्ये संघटनमंत्र्यांच्या कार्यशैलीविषयी तक्रार करण्याची सोय नसते. कारण, ते एखाद्याला पक्षांतर्गत खच्ची करू शकतात, असे बोलले जाते. त्यामुळे भुसारी यांच्याविषयी दबक्या आवाजात चर्चा होत असे.
सूत्रांनी सांगितले की, भुसारी यांच्या कार्यशैलीविषयी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे आमदार, खासदार व बऱ्याच जिल्हाध्यक्षांमध्ये नाराजी होती. राज्य शासनाचे चांगले निर्णय जनतेपर्यंत नेण्यासाठी पक्षसंघटना कमी पडली, असा नाराजीचा सूर होता.
तसेच, तूर प्रकरण, कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारवर टीका होत असताना पक्षसंघटना सरकारच्या बाजूने भक्कमपणे उभी राहिली नाही. त्याबाबत प्रदेशाध्यक्ष आणि संघटन मंत्री अशा दोघांवरही रोष होता. पण तो केवळ संघटन मंत्र्यांवर शेकला. पक्षांतर्गत काही जिल्ह्यांमध्ये असलेले वाद मिटविताना भुसारी यांनी स्पष्ट भूमिका घेतली नाही, असाही आक्षेप होता.
रविवारी आपल्या पदाचा राजीनामा देण्यापूर्वी भुसारी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी फोनवर पंधरा मिनिटे चर्चा केल्याचे समजते.
दरम्यान, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मध्यंतरी मुंबईत आले तेव्हा त्यांनी पक्षसंघटनेबाबत महत्त्वाच्या व्यक्तींची मते जाणून घेतली.
तेव्हापासूनच भुसारी यांच्याविषयी नजीकच्या काळात काही निर्णय घेतला जाईल, कदाचित त्यांना राजीनामा द्यायला सांगितले जाईल, अशी चर्चा होती.
>नवीन संघटन मंत्री कोण?
पक्षाचे नवे संघटन मंत्री कोण असतील. या पदावर संघाकडून माणूस पाठविला जाईल, असा निर्णय पूर्वीच झालेला आहे. त्यामुळे संघाच्या प्रचारकांमधून एखाद्याला पाठविले जाईल. निर्णयाला अपवाद करायचा ठरले तर मात्र मुख्यमंत्री, पक्षाचे लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने काम करणारे नाव समोर येऊ शकते.
अमित शहांकडे केली होती विनंती
भुसारी यांच्याबाबत भाजपाचे मुख्य प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी खुलासा पाठविला आहे. वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यामुळे जबाबदारीतून मुक्त करा, अशी विनंती भुसारी यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे केली होती. भुसारी यांचे संघटनेतील अमूल्य योगदान लक्षात घेऊन ही विनंती मान्य करण्यास शहा अनुकूल नव्हते. मात्र, भुसारी यांनी आग्रह धरल्याने त्यांना परवानगी देण्यात आली असे भंडारींनी म्हटले आहे.
>साठीचा निकष कशासाठी?
जाणकारांच्या मते, वयाच्या साठीनंतर कोणतीही जबाबदारी पक्षसंघटनेत घेता येणार नाही, असा भाजपात नियम नाही. साठीनंतर पक्षसंघटनेत महत्त्वाची पदे भूषविणारे अनेक नेते आहेत. भुसारींना साठीचा निकष कसा काय लागला? की त्यांना पदावरून हटविण्यास हे कारण पुढे करण्यात आले याबाबत उलटसुलट चर्चा आहे.