भुसावळ : आषाढीच्या दिवशीच झाली विठ्ठल मंदिरात चोरी
By Admin | Published: July 15, 2016 11:55 AM2016-07-15T11:55:07+5:302016-07-15T15:01:18+5:30
आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशीच विठ्ठल मंदिरात चोरट्यांनी दानपेटी लांबवल्याची धक्कादायक घटना भुसावळमध्ये घडली.
ऑनलाइन लोकमत
भुसावळ, दि. १५ - आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व भाविक पांडुरंगाच्या चरणी लीन होत असताना आजच्या दिवशीच भुसावळच्या विठ्ठल मंदिरात चोरट्यांनी डल्ला मारत दानपेटी लांबवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आषाढी एकादशीलाच घडलेल्या या घटनेने भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबतची माहिती अशी की, शहरातील जामनेर रोडवरील विकास कॉलनीत सुमारे पाच-सहा वर्षांपूर्वी विठ्ठल मंदिर उभारण्यात आले आहे. मंदिराची देखभाल स्थानिक रहिवासीच करीत असतात. वर्षभरापासून मंदिरातील दान पेटी उघडण्यात आली नव्हती. ती काल सर्वांसमोर उघडली जाणार होती. मात्र काही लोक हजर नसल्याने ती उघडण्यात आली नाही. ती आज आषाढीला उघडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र रात्रीच चोरट्यांनी दानपेटी फोडून त्यांनी चलनी नोटा घेऊन पलायन केले. सुटी नाणी नेण्याच्या भानगडीत चोरटे पडले नाहीत, असे सांगण्यात आले. आषाढी एकादशीलाच तेही श्री विठ्ठल मंदिरात चोरी झाल्याने या भागातील भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
बाजारपेठ पोलिसांच्या डीबी पथकाने घटनास्थळाची पाहणी केली मात्र अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले.