एक प्रयोग फसला, पण पवारांनी नवा मोहरा हेरला; भूषणसिंह राजे होळकर तुतारी हाती घेणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 02:05 PM2024-04-15T14:05:37+5:302024-04-15T14:08:38+5:30
Bhushansinh Raje Holkar: शरद पवार यांनी मोठी खेळी खेळत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांना सोबत घेण्यात घेण्यात यश मिळवलं आहे.
Sharad Pawar ( Marathi News ) :राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर होत असलेली ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. पक्षातील मोठा गट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेल्यानंतर राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार हे संघटनेची नव्याने बांधणी करत इतर पक्षांतील नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मिळालेला माढा मतदारसंघ रासपच्या महादेव जानकर यांना सोडण्यास पवारांनी तयारी दर्शवली होती. मात्र जानकर यांनी अचानक यू-टर्न घेत महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जानकर यांच्या रुपाने धनगर समाजाच्या महत्त्वाच्या नेत्याला आपल्यासोबत जोडण्याचा पवार यांचा प्रयत्न फसल्याची चर्चा सुरू होती. अशातच शरद पवार यांनी मोठी खेळी खेळत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांना सोबत घेण्यात यश मिळवलं आहे. भूषणसिंह राजे होळकर हे लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
अहिल्यादेवी होळकरांचे वंशज असलेले भूषणसिंह राजे होळकर हे आधी भाजपसोबत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांची शरद पवारांशी जवळीक वाढली होती. भूषणसिंह यांनी नुकतीच पवार यांची त्यांच्या पुण्यातील कार्यालयात भेटही घेतली होती. तेव्हापासूनच ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा रंगत होती. या चर्चेवर आता शिक्कामोर्तब होत असून १८ एप्रिल रोजी ते तुतारी हाती घेणार असल्याचे समजते.
पक्षप्रवेश करताच मिळणार मोठी जबाबदारी
भूषणसिंह राजे होळकर यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक संघटनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदाची जबाबदारी मिळणार असल्याची माहिती आहे. तसंच स्टार प्रचारकांच्या यादीतही त्यांचा समावेश होणार आहे. राज्यभरात महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेण्याच्या सूचना शरद पवार यांनी भूषणसिंह राजे होळकर यांना दिल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, भूषणसिंह राजे होळकर यांच्या पक्षप्रवेशाचा शरद पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघातही मोठा फायदा होऊ शकतो. कारण या मतदारसंघात धनगर मतदारांची संख्या लक्षणीय आहे. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात होत असलेल्या चुरशीच्या लढाईत एका-एका मताला महत्त्व प्राप्त झालं आहे. अशा स्थितीत भूषणसिंह राजे होळकर यांच्याकडून होणाऱ्या प्रचारामुळे धनगर मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून होईल.