काम अर्धवट असताना कंत्राटदाराला दिले बील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 02:27 AM2018-07-25T02:27:23+5:302018-07-25T02:27:44+5:30
माजी नगरसेवकाने वेधले लक्ष; पावसामुळे येथे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य
कल्याण : पूर्वेतील एका रस्त्याचे काम अर्धवट केलेले असताना महापालिकेने कंत्राटदाराला ९० टक्के बिलाची रक्कम दिली आहे. या विरोधात मनसेचे माजी नगरसेवक अनंता गायकवाड यांनी आक्षेप घेतला आहे. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण न झाल्यास उपोषणाचा इशारा गायकवाड यांनी महापालिका प्रशासनास दिला आहे.
पूर्वेतील प्रभाग क्रमांक १०० मध्ये शंभर फुटी रस्ता तयार करण्यास महापालिकेने २००९ मध्ये मंजुरी दिली होती. या कामाची निविदा आठ कोटी ४५ लाख रुपये खर्चाची होती. कंत्राटदाराने या रस्त्याचे काम अर्धवट केले आहे. तेथे रस्त्यावर केवळ खडी टाकली आहे. पावसामुळे येथे चिखलाचे साम्राज्य आहे. दुभाजक अर्धवट अवस्थेत बसविले आहेत. असे असताना रस्ता पूर्ण करण्यासाठी आणखी दोन कोटी रुपये त्याने मागितले आहेत. काम अर्धवट असताना महापालिकेने सात कोटी ६६ लाख बिल कंत्राटदारास दिले आहे.
आमराई परिसरातील रस्ता १८ मीटर रुंद करण्यासाठी २०१४ मध्ये मंजुरी देण्यात आली. हे काम १३ कोटी ५० लाख रुपये खर्चाचे आहे. रस्ते रुंदीकरणात बाधिताना विरोध केल्याने या रस्त्याचेही काम रखडले आहे. काम अर्धवट असताना कंत्राटदाराला तीन कोटी सहा लाखांचे बिल दिले. गायकवाड यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मिळविलीे.