'रावण'वर लागली 5 कोटी रुपयांची बोली, पण मालकाने विकण्यास दिला नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 06:13 PM2021-12-23T18:13:28+5:302021-12-23T18:14:06+5:30
'रावण' हा मारवाड जातीचा घोडा आहे. महाराणा प्रताप यांचा 'चेतक' घोडादेखील याच जातीचा होता.
मुंबई:महाराष्ट्रातील सारंगखेड यात्रा देशभरता प्रसिद्ध आहे. या यात्रेत विविध ठिकाणांहून अनेक घोडे विक्रीसाठी येतात. या यात्रेत विकल्या जणाऱ्या घोड्यांवर लाखो-करोडोंची बोली लागते. नुकतेच या यात्रेत महाराष्ट्रातील नाशिकचा एक घोडा मुख्य आकर्षण ठरला. 'रावण' नावाच्या या घोड्याचीच चर्चा सध्या सुरू आहे. चर्चेचे कारण म्हणजे, रावण नावाच्या या काळ्या घोड्यासाठी यात्रेत 5 कोटी रुपयांची बोली लागली आहे. अनेकजण या घोड्याला विकत घेण्यास तयार आहेत, पण घोड्याच्या मालकाने त्याला विकण्यास नकार दिला आहे.
कोणत्या जातीचा आहे 'रावण'?
मीडिया रिपोर्टनुसार सारंगखेडच्या यात्रेत आलेल्या रावणाची किंमत 5 कोटी निश्चित करण्यात आली आहे. त्याची बोली आधी लाखांपासून सुरू झाली होती. रावण हा मारवाड जातीचा आहे. रावणचे संपूर्ण शरीर काळ्या रंगाचे असून, त्याच्या कपाळावर पांढऱ्या रंगाच टिळा आहे. त्याला देवमन, कंठ, कुकड नाळ, नगाडा पुठ्ठा अशी शुभलक्षणे असल्यामुळे घोड्याची किंमत कोट्यवधींच्या घरात असल्याचे मालक असद सयैद यांनी सांगितले. या घोड्याची लांबी 68 इंच असून, या प्रामुख्याने प्रजननासाठी वापरला जातो.
असा आहे रावणचा दिवसाचा खुराक...
रावणला दररोज 1 किलो तूप, 10 लिटर दूध, पाच गावरान अंडी, बाजरी आणि ड्रायफ्रूट्स खातो. रावणाची काळजी घेण्यासाठी नेहमी दोन लोक असतात. रावणचे मालक असद सय्यद मूळ मुंबईचे आहेत. ते म्हणाले की, या घोड्याची आधी लाखात बोली लागत होती, मात्र आता 5 कोटींची बोली लागत आहे. मात्र असद सय्यद यांनी रावणला विक्री करण्यास नकार दिला आहे.
घोड्यावर दर महिन्याला लाखो रुपये खर्च
असद सय्यद यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, रावणला विकण्याचा त्यांचा अजून कोणताही विचार नाही. रावणला किती किंमत मिळते, हे समजण्यासाठी सारंगखेडच्या जत्रेत आणल्याचे त्यांनी सांगितले. असद यांनी सांगितल्यानुसार, रावणचा खुराक आणि इतर कामांसाठी दर महिन्याला लाखो रुपयांचा खर्च होतो.
महाराणा प्रताप यांचा घोडा याच जातीचा होता
एका अहवालानुसार मारवाडी घोड्यांच्या प्रजातीवर जगभरात संशोधन सुरू आहे. वीर महाराणा प्रताप यांच्याकडे 'चेतक' नावाचा घोडा होता. हा चेतकदेखील मारवाड प्रजातीचाच होता. महाराणा प्रताप यांच्या चेतक घोड्याच्या अनेक कथा इतिहासात वाचायला मिळतील. मारवाड घोड्यांमध्ये माणसांप्रमाणेच हुशारी आणि बुद्धी असते, असे म्हणतात. तसेच, हे घोडे लवकर थकत नाहीत, त्यामुळेच या प्रजातींच्या घोड्याला पूर्वी युद्धांमध्ये वापरले जायचे.