Dhananjay Munde : '‘ईडी’पेक्षा आमच्या शेतकऱ्यांच्या खिशातील बिडीची किंमत जास्त', धनंजय मुंडेंचा टाेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 19:01 IST2022-03-06T19:00:13+5:302022-03-06T19:01:09+5:30
Dhananjay Munde : केंद्रातील भाजपा सरकारकडून सध्या शासकीय यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे. आमच्या शेतकर्यांच्या खिशातील बिडीची किंमत केंद्र सरकारच्या ‘ईडी’पेक्षा जास्त आहे, असा उपराेधिक टाेला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी लगावला.

Dhananjay Munde : '‘ईडी’पेक्षा आमच्या शेतकऱ्यांच्या खिशातील बिडीची किंमत जास्त', धनंजय मुंडेंचा टाेला
उस्मानाबाद - केंद्रातील भाजपा सरकारकडून सध्या शासकीय यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे. नावलाैकिक असलेल्या सीबीआय, इन्कम टॅक्स तसेच ईडीची काहीही इज्जत ठेवली नाही. आमच्या शेतकर्यांच्या खिशातील बिडीची किंमत केंद्र सरकारच्या ‘ईडी’पेक्षा जास्त आहे, असा उपराेधिक टाेला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी लगावला.
उस्मानाबाद तालुक्यातील पाडाेळी येथे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी ते बाेलत हाेते. मंचावर राज्याचे अराेग्यमंत्री राजेश टाेपे, मंत्री संजय बनसाेडे, आमदार विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ. संजय दाैंड, माजी आमदार राहुल माेटे, राष्ट्रवादी युवती काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, जीवनराव गाेरे, सुरेश बिराजदार, सुरेश पाटील, अशाेक जगदाळे, महेंद्र धुरगुडे यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
मंत्री मुंडे म्हणाले, राज्यातील सध्याचे विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मी नेहमी जाहीर कार्यक्रमातून सांगायचाे, ‘‘साहेबांचा नाद करू नाका’’. मात्र, त्यांनी ऐकलं नाही. साहेबांचा (शरद पवार) नाद केला अन् हाेत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं हाेतं झालं. ६४ आमदार असलेल्या पक्षाचे मुख्यमंत्री झाले. ५४ आमदार असलेल्या पक्षाचे उपमुख्यमंत्री झाले अन् ४४ आमदार असणार्या पक्षाचे मंत्री झाले. आणि १०५ आमदार असेल्या भाजपाचे विराेधी पक्षनेते झाले. यालाच ‘हाेत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं हाेतं झालं’, असं म्हणतात, अशा शब्दात टाेला लगावला. नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेस नंबर १ चा पक्ष ठरला. आमचे सर्वाधिक नगराध्यक्ष झाले. तरीही भाजपाची खुमखुमी कमी झाली नाही. भल्याभल्यांच्या मागे कधी ईडी लावली जाते. कधी सीबीआय तर कधी इन्कम टॅक्स. त्यामुळे भाजपाची खराेखर खुमखुमी घालवायची असेल तर हाेऊ घातलेल्या जिल्हा परिषद तसेच नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसला नंबर १ चा पक्ष बनवा. यानंतर मात्र भाजपाचे लाेक महाराष्ट्राच्या मातीत राष्ट्रवादीचा नाद करणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील सर्वात महत्वाच्या संविधानिक पदावर जाे व्यक्ती बसताे, आज ताेच व्यक्ती आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अभद्र बाेलत असेल तर या महाराष्ट्राच्या आणि छत्रपतींच्या लेकरांनी कसं सहन करायचं? याबाबतही येणार्या काळात आम्हाला विचार करावा लागेल, असे ते म्हणाले. मेळाव्यासाठी जिल्हाभरातील हजाराेच्या संख्येने लाेक जमले हाेते.