बिद्रेच्या पतीचा आरोप; भाजपाच्या तीन आमदारांना हत्येची होती माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 03:10 AM2018-03-09T03:10:08+5:302018-03-09T03:10:08+5:30
माझी पत्नी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येची भाजपाच्या तीन आमदारांना पूर्ण कल्पना होती. हे तिघेही माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील याच्याबरोबरच अभय कुरुंदकर याच्या फ्लॅटवर ‘त्या’ रात्री येऊन गेले होते, असा सनसनाटी आरोप मृत अश्विनीचे पती राजू गोरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
कोल्हापूर - माझी पत्नी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येची भाजपाच्या तीन आमदारांना पूर्ण कल्पना होती. हे तिघेही माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील याच्याबरोबरच अभय कुरुंदकर याच्या फ्लॅटवर ‘त्या’ रात्री येऊन गेले होते, असा सनसनाटी आरोप मृत अश्विनीचे पती राजू गोरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
गोरे तसेच अश्विनी यांचे वडील जयकुमार बिद्रे व भाऊ आनंद यांनी पोलीस यंत्रणेवर मोठा राजकीय दबाव असल्याचा आरोप करून नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांना सहआरोपी करण्याची मागणी केली. अभयचा भाऊ संजय कुरुंदकर पुण्यात पोलीस दलात आहे. तो साक्षीदारांवर दबाव आणत असल्याने त्याची बदली गडचिरोलीला करावी, अशा मागणीही त्यांनी केली.
राजू गोरे म्हणाले, ‘माझी पत्नी अश्विनी दि. ११ एप्रिल २०१६पासून बेपत्ता आहे. त्याच दिवशी संध्याकाळी राजेश पाटील व भाजपाचे तीन आमदार अंधेरी परिसरातील एका हॉटेलवर थांबले होते. तेथे अभय कुरुंदकर याचा फोन आला. त्यानंतर हे चौघेही कुरुंदकर याच्या फ्लॅटवर गेले. त्यामुळेच त्यांना या हत्येची पूर्ण कल्पना होती. अश्विनी यांचे भाऊ आनंद म्हणाले, ‘आतापर्यंत शासनयंत्रणेमधील मुख्यमंत्र्यांपासून ते कोणत्याही वरिष्ठ पोलीस अधिकाºयांपर्यंत कुणीही आमची भेट घेतलेली नाही.’
बाईला मारण्यात कसला पुरुषार्थ?
लष्करामध्ये १८ वर्षे सेवा बजावलेले जयकुमार बिद्रे म्हणाले, ‘परिस्थिती नसतानाही मी तीन मुलांना शिकवलं. अश्विनी शिकली. चांगल्या नोकरीला लागली. एकदा मुलं मोठी झाल्यावर त्यांना आम्ही कशाबाबत आणि काय सांगायचं? मात्र एका बाईला मारण्यात कसला आलाय पुरुषार्थ? या प्रकरणी अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी.