दहावी अन् बारावीच्या निकालाबाबत शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 09:48 AM2020-06-17T09:48:57+5:302020-06-17T09:49:57+5:30
मार्च महिन्यात शेवटच्या आठवड्यात कोरोनामुळे देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे, राज्यातील शैक्षणिक क्षेत्रावरही याचा परिणाम झाला.
मुंबई - देशभरात गेल्या ३ महिन्यांपासून कोरोनाचा कहर सुरू असल्यामुळे शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत. देशातील सर्वच राज्यांमध्ये कोरोनाचा विपरित परिणाम पाहायला मिळत असून महराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक परिणाम दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर, लॉकडाऊनमुळे दहावी-बारावीच्या परीक्षा आणि त्यांच्या निकालांवर देखील परिणाम झाला आहे. विद्यार्थी अन् पालकांना निकालाची प्रतीक्षा लागली असून आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
मार्च महिन्यात शेवटच्या आठवड्यात कोरोनामुळे देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे, राज्यातील शैक्षणिक क्षेत्रावरही याचा परिणाम झाला. दहावीचा एक पेपर रद्द करण्यात आला असून अंतिम वर्षांच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. तर, दहावी आणि बारावी परीक्षांच्या निकालावर या कोरोना महामारीच्या लॉकडाउनचा परिणाम झाला आहे. त्यामुळे, यंदा दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल उशीर लागणार असून विद्यार्थ्यांना आता निकालाची प्रतीक्षा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नुकतेच, जुलै महिन्यापासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात करण्यास मान्यता दिली. त्यामुळे, शैक्षणिक वर्ष लवकरच सुरु होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, अद्यापही दहावी व बारावीच्या परीक्षांचा निकाल लागला नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये नवीन प्रवेशासाठी संभ्रम आहे. मात्र, जुलै महिन्यात निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय.
‘जुलै महिन्यात या दोन्ही परीक्षांचे निकाल लावण्याचा आमचा प्रयत्न आहे’,असं त्या म्हणाल्या आहेत. एबीपी माझावर एका कार्यक्रमात बोलताना वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागू नये, म्हणून हे निकाल जुलै महिन्यात लावण्याचा आमचा प्रयत्न असेल. ‘कोरोना आणि लॉकडाऊनमुळे यंदा हे निकाल जवळपास महिनाभर उशिरा लागणार आहेत. आमचा असा प्रयत्न आहे की बारावीचे निकाल १५ जुलैपर्यंत आणि दहावीचे निकाल जुलै अखेरपर्यंत लावले जावेत. जेणेकरून ऑगस्ट महिन्यात पुढच्या वर्षांची प्रवेश प्रक्रिया सुरू करता येईल’, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय. शिक्षणमंत्र्यांच्या या घोषणेमुळे विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.