जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का, रक्षा खडसेंचा उमेदवारी अर्ज बाद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 08:31 AM2021-10-21T08:31:44+5:302021-10-21T08:34:22+5:30
jalgaon district co operative bank election 2021: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत BJPला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत उमेदवार म्हणून उतरणाऱ्या भाजपा खासदार Raksha Khadse आणि विधानपरिषदेमधील आमदार Smita Wagh यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत.
जळगाव - जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत उमेदवार म्हणून उतरणाऱ्या भाजपा खासदार रक्षा खडसे आणि विधानपरिषदेमधील आमदार स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. दरम्यान, मुक्ताईनगर विकास सहकारी सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे बिनविरोध निवडून येतील हे निश्चित झाले आहे.
एकनाथ खडसेंच्या सूनबाई असलेल्या खासदार रक्षा खडसे यांनी महिला राखीव तसेच ओबीसी प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भाजपाच्या अन्य नेत्या स्मिता वाघ यांनी अमळनेर विकास सोसायटीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान आता धरणगाव विकास सोसायटी मतदारसंघाबरोबरच अमळनेर विकास सोसायटी आणि बोदवड तसेच मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघातून उमेदवार बिनविरोध निवडून येणार आहेत.
स्मिता वाघ यांचा अर्ज बाद झाल्याने अमळनेर विकास सोसायटीमधून काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे. तर मुक्ताईनगर विकास सोसायटीमधून एकनाथ खडसे यांचा विजय निश्चित झाला आहे.
दरम्यान, मुक्ताईनगर विकास सहकारी सोसायटी मतदारसंघामध्ये आता एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचे उमेदवारी अर्ज उरले आहेत. मात्र येथून रोहिणी खडसे ह्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. त्या महिला राखीव मतदार संघातून लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, भुसावळ विकास सहकारी सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संतोष चौधरी यांचा अर्ज बाद झाला आहेत. त्यामुळे याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमण भोळे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.