रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, माजी आमदार तथा पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 04:53 PM2021-11-23T16:53:26+5:302021-11-23T16:54:13+5:30
Suresh Lad News: राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला Raigad जिल्ह्यातमध्ये मोठा धक्का बसला आहे. रायगडमधील कर्जत मतदारसंघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
रायगड - राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसलारायगड जिल्ह्यातमध्ये मोठा धक्का बसला आहे. रायगडमधील कर्जत मतदारसंघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोकण दौरा सुरू असतानाच लाड यांनी दिलेला राजीनामा हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
एकेकाळी शेकापचा बालेकिल्ला असलेल्या रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बऱ्यापैकी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असलेले सुरेश लाड हे विधानसभेच्या कर्जत मतदार संघातून २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत निवडून आले होते. मात्र २०१९ मध्ये त्यांना पराभवाचा धक्का बसला होता. शिवसेनेचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र तरीही त्यांचे पक्षातील महत्त्व कायम होते. काही दिवसांपूर्वी त्यांची सिडकोच्या अध्यक्षपदासाठीही चर्चा सुरू होती. मात्र त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, प्रकृतीच्या कारणास्तव आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे लाड यांनी आपल्या पत्रात नमुद केले आहे. मात्र त्यांच्या राजीनाम्यामागे काही राजकीय कारणे आहेत,अशी चर्चा रंगली आहे.