दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 03:32 PM2024-05-02T15:32:41+5:302024-05-02T15:35:18+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. येथील नाराज असलेले माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडखोरी केली असून, अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ते अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करतील.
लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवार ३ मे ही शेवटची तारीख आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. येथील नाराज असलेले माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडखोरी केली असून, अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ते अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करतील.
दिंडोरीमध्येभाजपाने विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री भारती पवार यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, भाजपाकडून उमेदवारी न देण्यात आल्याने तसेच पक्षाकडून निवडणूक प्रक्रियेत आपली फारशी दखल न घेतली गेल्याने हरिश्चंद्र चव्हाण हे नाराज होते. अखेरीस या नाराजीचं रूपांतर बंडखोरीत झालं आहे.
हरिश्चंद्र चव्हाण यांनी २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. २०१४ मध्ये त्यांनी विद्यमान खासदार भारती पवार यांचा २ लाख ४७ हजार मतांनी पराभव केला होता. भारती पवार त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढल्या होत्या. दरम्यान, २०१९ मध्ये भारती पवार भाजपामध्ये आल्या. त्यानंतर भाजपाने हरिश्चंद्र पवार यांची उमेदवारी नाकारून भारती पवार यांना उमेदवारी दिली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भारती पवार यांनी १ लाख ९८ हजार ७७९ मतांनी विजय मिळवला होता.