Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीसांचा शिवसेनेला दणका! विधानसभा ‘या’ समितीतून ठाकरे गट बेदखल?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 03:30 PM2022-08-09T15:30:50+5:302022-08-09T15:31:11+5:30
Maharashtra Political Crisis: विधिमंडळातील एका महत्त्वाच्या समितीत शिवसेनेचा कोणताही सदस्य नसल्यामुळे त्यातून उद्धव ठाकरे गटाला बेदखल आले का, याची चर्चा रंगली आहे.
Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन ३८ दिवस झाल्यानंतर अखेर मंत्रिमंडळाच्या मुहुर्ताला मूर्त रुप आले. यात भाजपच्या ९ आणि शिंदे गटातील ९ आमदारांनी शपथ घेतली. यानंतर लगेचच नव्या शिंदे-भाजप सरकारने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाला मोठा दणका दिल्याचे सांगितले जात आहे. विधानसभेच्या एका महत्त्वाच्या समितीतून शिवसेनेचा कोणताही सदस्य नसल्यामुळे त्यातून उद्धव ठाकरे गटाला बेदखल करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभेच्या कामकाज सल्लागारांची एक समिती असते. ही समिती महत्त्वाची मानली जाते. आणि या कामकाज सल्लागार समितीतून उद्धव ठाकरे गटाच्या एकाही सदस्याचा समावेश नसल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे विधिमंडळातील गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा अध्यक्षांकडे याबाबतची तक्रार केल्याची माहिती देण्यात आली आहे.
ठाकरे गटातील एकाही सदस्याला समितीत संधी नाही?
विधिमंडळाचे अधिवेशन घेण्यात येते, तेव्हा कामकाज सल्लागार समितीची एक बैठक बोलावली जाते. या सल्लागार समितीत प्रत्येक पक्षाच महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी यांचा समावेश केला जातो. या सर्वानुमते अधिवेशनाची तारीख, ठिकाण यांसह अन्य बाबी ठरवण्यात येतात. यामध्ये प्रत्येकाचा सहभाग असतो. सर्वजण आपापली मते देऊन, अमूक एक गोष्ट करण्याबाबत सांगत असतात. मात्र, या सल्लागार समितीच्या बैठकीविषय शिवसेनेच्या म्हणजेच उद्धव ठाकरे गटाच्या आमदाराला पत्र आलेले नाही, अशी माहिती देण्यात आलेली आहे.
विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात काय?
तशी तरतूद असल्याचे दिसले नाही. याबाबत चिंता व्यक्त करणारे आणि रोष व्यक्त करणारे एक पत्र गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा अध्यक्षांना लिहिले आहे. तसेच या समितीत आमचाही सहभाग असावा, नियमबाह्य आणि बेकायदेशीर कृती करू नये. विधिमंडळात शिवसेना पक्ष अधिकृतरित्या असताना आम्हाला उपरोक्त समितीच्या सदस्यांची शिफारस करण्यासाठी पत्र दिलेले नाही, असे सांगत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. तशी तक्रारच अजय चौधरी यांनी दिली आहे.