उद्धव ठाकरेंना मोठा झटका; शिवसेनेचे १५ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 08:54 AM2022-07-14T08:54:37+5:302022-07-14T08:55:15+5:30
येत्या १८ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपा आणि मित्रपक्षाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल ४० शिवसेना आमदारांचा गट बनवून थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोर आव्हान निर्माण केले. शिंदे यांच्या पवित्र्यामुळे उद्धव ठाकरे यांना राज्यातील सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रिपद सोडण्याची नामुष्की ओढावली. शिंदे यांनी ५० आमदारांना सोबत घेऊन भाजपाला साथ दिली. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर एकनाथ शिंदे विराजमान झाले आणि उपमुख्यमंत्रिपदाची धुरा देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावर आली.
आमदारांसोबत अनेक नगरसेवकही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करत आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदारांचा मोठा गट शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता आहे. खासदारांचा दोन तृतीयांश गट शिंदे गटात सहभागी होऊ शकतो. सध्या याबाबत हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेना खासदारांची बैठक पार पडली. यात शिवसेनेचे १५ खासदार उपस्थित होते. ४० आमदारांनंतर शिवसेनेच्या १८ पैकी १५ खासदार वर्षा बंगल्यावर ही बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. झी २४ तास या वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.
शिवसेना खासदारांचा मोठा गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यात संसदीय कार्यकारणीचा मोठा गट जर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेला तर संसदीय राजकारणातील अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभा राहिल. विविध महापालिकेतील नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाताना दिसत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे बंड शिवसेनेसमोर आव्हान निर्माण करणारं आहे.
राष्ट्रपतिपदासाठी शिवसेनेचा NDA उमेदवाराला पाठिंबा
येत्या १८ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपा आणि मित्रपक्षाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत शिवसेनेच्या काही खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होते. त्यानंतर खासदारांमध्येही बंड होऊ नये यासाठी सावध भूमिका घेत उद्धव ठाकरे यांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. एका आदिवासी समाजातील नेतृत्वाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. जी भूमिका आता उद्धव ठाकरे यांनी घेतली ती अडीच वर्षापूर्वी घेतली असती तर आज आमच्यावर ही वेळ आली नसती असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.