Maharashtra Political Crisis: ताकद दुपटीने वाढतेय! आता ‘या’ जिल्ह्यांत शिवसेनेला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 11:39 AM2022-07-17T11:39:36+5:302022-07-17T11:40:25+5:30
Maharashtra Political Crisis: शिवसेनेतून जे गेले ते बेन्टेक्स होते, आता राहिलेत ते अस्सल सोने, असे म्हणणारे खासदारही शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सक्रीय झाले आहेत. मात्र, तरीही शिवसेनेला राज्यातील ठिकठिकाणी एकावर एक धक्के लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पालघर यांसह राज्यातील अनेक ठिकाणांहून शिंदे गटाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा वाढताना पाहायला मिळत आहे.
राज्यात शिवसेनेतील अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेसाठी हा एक मोठा धक्का मानला जातो. अशात आता अमरावतीमध्येही शिवसेनेला खिंडार पडलं आहे. कारण, शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात दाखल झाले आहेत. उपमहापौर ठाणे रमाकांत माडवी यांच्या उपस्थितीत अमरावतीच्या दर्यापूर तालुका येथील गोपाल अरबट यांच्या नेतृत्वात जाहीर प्रवेश केला आहे. हा मतदार संघ अमरावतीचे माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांचा असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक बैठक पार पाडली.
अमरावती येथे गुप्त बैठक
ठाणे येथील उपमहापौर रमाकांत माडावी यांची अमरावती येथे गुप्त बैठक पार पडली. त्यानंतर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान दर्यापूर इथे सुद्धा शिवसेनेचे तालुकाप्रमुख गोपाल पाटील अरबट यांच्या नेतृत्वात शेकडो पदाधिकाऱ्यांनी दर्यापूर इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देत त्यांच्या गटात प्रवेश केलेला आहे. या प्रवेशामुळे आता अमरावती जिल्ह्यात शिंदे गटाचे वर्चस्व मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
दरम्यान, शिवसेनेतून जे गेले ते बेन्टेक्स होते, आता राहिलेत ते अस्सल सोने, असे म्हणणारे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक हेदेखील पक्षाला 'जय महाराष्ट्र' म्हणण्याच्या तयारीत आहेत. याबाबत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते अधिकृत निर्णय घेण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, पक्षाचे दुसरे खासदार धैर्यशील माने हेदेखील याच मार्गावर असल्याचे समजते.