मोठी बातमी! विनायक ग्रुप, अबू आझमींशी संबंधित ठिकाणांवर आयकर विभागाचे छापे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 07:08 PM2023-10-05T19:08:37+5:302023-10-05T19:09:08+5:30
Abu Azmi IT Raid: एप्रिल महिन्यात अबू असीम आझमी यांना 160 कोटी रुपयांच्या करचोरीप्रकरणी आयकर विभागाने समन्स बजावले होते.
उत्तर प्रदेशमधून सध्याच्या घडीची मोठी बातमी येत आहे. आयकर विभागाने वाराणसीमध्ये मोठे छापासत्र सुरु केले आहे. यामध्ये विनायक ग्रुप आणि सपाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू आझमींशी संबंधित ठिकाण्यांवर हे छापे टाकण्यात येत आहेत. याचबरोबर आयकर विभागाच्या टीमने मुंबई आणि दिल्लीमध्येही अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे.
एप्रिल महिन्यात अबू असीम आझमी यांना 160 कोटी रुपयांच्या करचोरीप्रकरणी आयकर विभागाने समन्स बजावले होते. प्राप्तिकर विभागाने वाराणसीच्या विनायक ग्रुपची चौकशी सुरू केल्यानंतर आझमी यांच्याशी धागेदोरे आयकर विभागाला सापडले होते.
एवढेच नाही तर आयकर व ईडीने इतर ठिकाणीही छापेमारी केली आहे. पालिका भरती घोटाळ्याप्रकरणी पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री रथिन घोष यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. चेन्नईतील डीएमके खासदार एस जगतरक्षकन यांच्या घरावर आयटीने छापा टाकला. तेलंगणातील बीआरएस आमदार मगंती गोपीनाथ आणि कर्नाटकातील शिवमोग्गा येथील डीसीसी बँकेचे अध्यक्ष मंजूनाथ गौड़ा यांच्या घरावर छापे टाकण्यात आले आहेत.
विनायक ग्रुप आणि अबू आझमींचा संबंध काय?
विनायक ग्रुपने वाराणसीमध्ये अनेक इमारती, व्यावसायिक शॉपिंग सेंटर्स, मॉल्स आणि निवासी उंच इमारती बांधल्या आहेत. कागदोपत्री विनायक ग्रुपमध्ये तीन भागीदार होते- सर्वेश अग्रवाल, समीर दोशी आणि आभा गुप्ता. आभा गुप्ता या दिवंगत गणेश गुप्ता यांच्या पत्नी आहेत. गणेश गुप्ता हे आझमींचे जवळचे मित्र आणि सहकारी असल्याचे सांगितले जाते. गणेश गुप्ता महाराष्ट्रात समाजवादी पक्षाचे सरचिटणीस होते आणि कुलाबा येथील आझमी यांच्या इमारतीतून त्यांचे कार्यालय चालवत होते.
तपासादरम्यान तिन्ही भागीदारांच्या व्हॉट्सअॅप चॅट, ईमेल आणि स्टेटमेंट अॅक्सेस करण्यात आले होते. विनायक ग्रुपमधून मिळणारे उत्पन्न चार भागात वाटून घेतले जात होते. हा चौथा भाग अबू असीम आझमी यांच्याकडे गेल्याचे आयकर विभागाचे म्हणणे आहे. आजतकने ही बातमी दिली आहे.