राजकीय टोलेबाजीचे थरावर थर! सर्वसामान्यांचे मनोरंजन; ‘जय जवान’ची ९ थर रचून सलामी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 05:33 AM2022-08-20T05:33:46+5:302022-08-20T05:35:14+5:30
ठाण्याच्या टेंभी नाका येथे स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित दहीहंडी उत्सवात नऊ थरांचा मानवी मनोरा रचून सलामी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क । ठाणे/मुंबई
निमित्त होते दहीहंडी उत्सावाचे परंतु यावेळी उपस्थित असलेल्या नेत्यांना राज्यात अलिकडेच झालेल्या सत्तांतरांवर टीकाटिप्पणी करण्याचा मोह टाळता आला नाही. या टोलेबाजीमुळे सर्वसामान्यांचे मात्र चांगले मनोरंजन झाले. जोगेश्वरी उपनगरातील जय जवान गोविंदा पथकाच्या तरुणांनी शुक्रवारी ठाण्याच्या टेंभी नाका येथे स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित दहीहंडी उत्सवात नऊ थरांचा मानवी मनोरा रचून सलामी दिली. एकावर एक थर रचण्यासाठी सरसर वर चढत असताना तिथे उपस्थित नागरिक कौतुकाने पाहत होते.
एकनाथ शिंदे: ५० थरांची हंडी, आम्ही आधीच फाेडली
दीड महिन्यांपूर्वी आम्ही ५० थर लावून मोठी राजकीय हंडी फोडली, असा टोला लगावतानाच, गोविंदा नऊ थर लावून हंडी फोडतात; पण आमचे थर येत्या काळात आणखी वाढतील, मलई मात्र सामान्यांना मिळेल या शब्दांत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत आणखी फोडाफोडीचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. गोकुळाष्टमीनिमित्त मुंबई, ठाण्यात दहीहंडीचे जंगी कार्यक्रम उत्साहात झाले.
देवेंद्र फडणवीस: मलई तर सामान्यांनाच मिळणार
मुंबईतील वरळीचे जांबोरी मैदान व अन्य ठिकाणी भाजप व काही मंडळाच्या वतीने आयोजित दहीहंडी कार्यक्रमात फडणवीस यांनी, आता जी दहीहंडी फोडली आहे त्याचे लोणी सामान्यांना मिळणार आहे. राज्याच्या विकासातही हाच अनुभव सगळ्यांना येईल, मूठभर लोकांनाच सरकारचा फायदा होणार नाही, असे म्हणत आधीच्या ठाकरे सरकारला चिमटे काढले.
आदित्य ठाकरे: थर लावले की त्यांचा थरकाप उडालाय
त्यांनी ५० थर लावले की त्यांचा थरकाप उडालाय, हे सगळ्यांना ठावूक आहे, असे प्रत्युत्तर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिले. ते म्हणाले की, किमान आज तरी राजकारण नको, प्रत्येक ठिकाणी राजकारणाची गरज नाही. २४ तास राजकारण केले तर सणांचे महत्त्व काय राहील?