पोलीस दलात मोठे बदल; १५ आयपीएसच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 07:02 AM2018-05-31T07:02:19+5:302018-05-31T07:02:26+5:30
राज्य सरकारने बुधवारी १५ आयपीएस अधिकाऱ्यांची बदली केली.
मुंबई : राज्य सरकारने बुधवारी १५ आयपीएस अधिकाऱ्यांची बदली केली. प्रभात कुमार, अर्चना त्यागी, संजय सक्सेना, प्रशांत बुरडे, आर. डी. शिंदे, डॉ. सुहास वारके, अश्वती दोर्जे, डॉ. छेरिंग दोर्जे, के. एम. मल्लिकार्जून प्रसन्ना, यशस्वी यादव या दहा अधिकाºयांना पदोन्नती देण्यात आली आहे.
सह पोलीस आयुक्त (प्रशासन) मुंबई अर्चना त्यागी यांना पदोन्नतीने अतिरिक्त पोलीस महासंचालक (राज्य राखीव पोलीस दल; मुंबई) येथे पाठविण्यात आले आहे. सह पोलीस आयुक्त (गुन्हे); मुंबई संजय सक्सेना आता प्रशिक्षण व खास पथके विभाग; मुंबईचे नवे अतिरिक्त पोलीस महासंचालक असतील. कायदा व सुव्यवस्था; मुंबई येथील विशेष पोलीस महानिरीक्षक प्रभात कुमार आता पदोन्नतीने आर्थिक गुन्हे शाखेचे (मुंबई) अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून जात आहेत.
नवी मुंबईचे सह पोलीस आयुक्त प्रशांत बुरडे यांना पदोन्नतीने उप महासमादेशक गृहरक्षक दल व उपसंचालक नागरी संरक्षण या पदावर पाठविण्यात आले आहे. राज्य राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संदीप बिश्नोई हे आता अतिरिक्त पोलीस महासंचालक (आस्थापना; मुंबई) असतील. सागरी सुरक्षा व व्हीआयपी सुरक्षेचे अतिरिक्त पोलीस महासंचालक धनंजय कमलाकर यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक (नियोजन व संनियंत्रण) या पदावर पाठविण्यात आले आहे. मध्यंतरी वादात सापडलेले कमलाकर यांचे हे पुनर्वसन मानले जाते.
देवेन भारती यांना मुंबई सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) या पदावर तूर्त कायम ठेवण्यात आले आहे.
यादव यांची प्रतीक्षा संपली
औरंगाबादच्या पोलीस आयुक्त पदावर असताना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले यशस्वी यादव यांची बदली सागरी सुरक्षा व व्हीआयपी सुरक्षा; मुंबई येथे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी करण्यात आली आहे.
यशस्वी यादव अनेक दिवसांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. आता त्यांना पदोन्नती देऊन पाठविण्यात आले असले तरी ही ‘साईड पोस्टिंग’ मानली जाते. गुन्हे अन्वेषण विभाग; पुणेचे पोलीस उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांची बदली अमरावती परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून करण्यात आली आहे. दहशतवादविरोधी पथक; मुंबईचे पोलीस उप महानिरीक्षक डॉ. सुहास वारके हे आता नांदेड परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक असतील.
सशस्र पोलीस मुख्यालय; नायगाव मुंबई येथे अतिरिक्त पोलीस आयुक्त असलेल्या अश्वती दोर्जे यांची बदली पदोन्नतीने महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे संचालकपदी करण्यात आली आहे. डॉ. छेरिंग दोर्जे हे आतापर्यंत पश्चिम प्रादेशिक विभाग; मुंबई येथे अतिरिक्त पोलीस आयुक्त होते. आता त्यांची बदली पदोन्नतीने नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी करण्यात आली आहे.
अतिरिक्त पोलीस आयुक्त; गुन्हे शाखा मुंबई के. एम. एम. प्रसन्ना हे नागपूर परिक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक असतील.