प्रशासनात मोठा खांदेपालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 06:48 AM2018-06-12T06:48:53+5:302018-06-12T06:48:53+5:30
राज्य सरकारने सोमवारी ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना मोठा खांदेपालट केला. सुनील पोरवाल यांच्याकडे गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.
मुंबई : राज्य सरकारने सोमवारी ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना मोठा खांदेपालट केला. सुनील पोरवाल यांच्याकडे गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.
आतापर्यंत अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) असलेले सुधीरकुमार श्रीवास्तव यांची बदली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. श्रीवास्तव हे मुख्य सचिव पदाच्या शर्यतीत होते. मात्र ती संधी दिनेशकुमार जैन यांना देण्यात आली. श्रीवास्तव यांची गृह विभागातून बदली करण्यात येणार असल्याचे वृत्त लोकमतने आधीच दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदेश दौºयावर रवाना होण्यापूर्वी आयएएस अधिकाºयांच्या बदल्यांना मंजुरी दिली.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची बदली सामान्य प्रशासन विभागात त्याच पदावर करण्यात आली आहे.आज गृह विभागात पाठविण्यात आलेले सुनील पोरवाल आतापर्यंत उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव होते.पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतीश गवई यांना आता पोरवाल यांच्या जागी उद्योग,ऊर्जा विभागात पाठविण्यात आले आहे.
वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) वंदना कृष्णा या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या नव्या अतिरिक्त मुख्य सचिव असतील. आतापर्यंत शालेय शिक्षण विभाग सांभाळत असलेले नंदकुमार यांना प्रतीक्षेवर ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव अनिल डिग्गीकर हे पर्यावरण विभागाचे नवे प्रधान सचिव असतील. सामान्य प्रशासन विभागात प्रधान सचिव असलेले राजगोपाल देवरा यांची बदली त्याच पदावर वित्त विभागात (सुधारणा) करण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशीषकुमार सिंग हे आता परिवहन विभागाचे प्रधान सचिव असतील. त्यांच्या जागी सार्वजनिक बांधकाम विभागात मनोज सौनिक येत आहेत. सौनिक हे आतापर्यंत परिवहन व बंदरे विभागाचे प्रधान सचिव होते.
मनोज सूर्यवंशी हे नाशिकच्या आदिवासी विकास महामंडळाचे नवे व्यवस्थापकीय संचालक असतील. संजय मिणा यांची बदली आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त (ठाणे) या पदावर करण्यात आली आहे.