Shiv Sena Symbol: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! अंधेरी पोटनिवडणुकीसाठी 'धनुष्यबाण' कोणालाच नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 09:37 PM2022-10-08T21:37:39+5:302022-10-08T21:38:04+5:30
उद्धव ठाकरे किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणत्याही गटाने तूर्तास 'शिवसेना' हे नावदेखील वापरू नये, असा आदेश ECI ने दिला आहे. याशिवाय, नव्या चिन्हांसाठी १० ऑक्टोबरला दुपारी १ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
Shiv Sena Symbol, ECI: निवडणूक आयोगाकडे प्रतिक्षेत असलेल्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावर आज निर्णय घेण्यात आला. अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी, उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणत्याही गटाला शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही, असे राष्ट्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हा एक मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह हे केंद्रीय निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरुपात गोठवले आहे. शिवसेना हे नावदेखील सध्या उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे या दोन्ही गटांपैकी कोणालाही वापरता येणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
Both groups shall also be allotted such different symbols as they may choose from the list of free symbols notified by the Election Commission for the purposes of the current bye-elections. Accordingly, both groups are hereby directed to furnish, latest by 1pm on 10th October.
— ANI (@ANI) October 8, 2022
खरी शिवसेना कोणती? यावर अद्याप निवडणूक आयोगाला निर्णय घेता आलेला नाही. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात हा हंगामी निर्णय घेण्यात आला आहे. अंधेरी पोटनिवडणूक अगदी जवळ येऊन ठेपली असताना निवडणूक आयोगाचा हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्काच मानला जात आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे आयोगाकडून तात्पुरत्या स्वरूपात गोठवलं गेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. त्यासोबतच, नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यावे लागणार आहेत.
ठाकरे आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगासमोर आपापले दावे करण्यात आले होते. ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगाची मॅरेथॉन बैठक पार पडली आणि या बैठकीत दोन्ही दाव्यांवर विचार करण्यात आला. त्यानंतर शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण हे तात्पुरते गोठवण्यात आल्याचं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं.
निवडणूक कधी? उमेदवार कोण?
शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर 3 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार असून ६ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. या निवडणुकीसाठी अद्याप तरी कोणीच आपला उमेदवार जाहीर केलेला नाही, पण शिवसेनेकडून रमेश लटके यांच्या पत्नीला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तर भाजपाकडून मुरजी पटेल यांच्या नावाची चर्चा आहे.