राज्य सरकारचा मोठा निर्णय; ३१ डिसेंबरपर्यंत नोंदणी केल्यास चार महिने स्टॅम्प ड्युटीत सवलत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 12:31 PM2020-12-21T12:31:55+5:302020-12-21T12:45:23+5:30
राज्य सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्कात दिली आहे तीन टक्के सवलत..
पुणे : येत्या ३१ डिसेंबरपुर्वी मालमत्तेची नोंदणी करून मुद्रांक शुल्क भरल्यास पुढील चार महिन्यांत प्रत्यक्ष दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन दस्त नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांना मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ मिळ्वा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्कात तीन टक्के सवलत दिली आहे. मुद्रांक शुल्कात सवलत असल्याने सदनिका खरेदी-विक्रीमध्ये वाढ झाली आहे. येत्या दोन आठवड्यात दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने हा निर्णय घेतला आहे.
याबाबतचे आदेश राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक ओमप्रकाश देशमुख यांनी दिले आहेत. दस्त नोंदणीचे प्रमाण वाढल्याने सुटीच्या दिवशी देखील दस्त नोंदणी कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
२६ डिसेंबर रोजी शनिवार, तर २५ डिसेंबर रोजी नाताळची सुटी आहे. मात्र, या दिवशी देखील दस्त नोंदणी सुरू राहणार आहे. याबरोबरच पुणे, मुंबई आणि ठाणे या तिन्ही जिल्ह्यांमध्ये दस्त नोंदणीच्या वेळा वाढवण्यात आल्या आहेत. त्यानूसार या ठिकाणची दस्त नोंदणी कार्यालये सकाळी ७.३० ते रात्री ८.४५ पर्यंत दोन सत्रांत सुरू ठेवण्यात आली आहेत.