गरिबांना उपचार नाकारणा-या बड्या रुग्णालयांचे ‘आॅपरेशन’! धर्मादाय आयुक्तांनी वेशांतर करून केले ‘स्टिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 05:23 AM2017-09-14T05:23:33+5:302017-09-14T05:24:14+5:30

गरीब रुग्णांवरील उपचाराच्या नावाखाली सरकारच्या सवलती लाटणारी राज्यातील धर्मादाय रुग्णालये, गरीब रुग्णांना दारातही उभे करत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. राज्य धर्मादाय आयुक्तांनी स्वत: मुंबईतील नानावटी रुग्णालयाचे ‘स्टिंग आॅपरेशन’ करून, हे बिंग फोडल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Big hospitals' operation to refuse treatment of poor people! 'Sting' done by charity commissioner | गरिबांना उपचार नाकारणा-या बड्या रुग्णालयांचे ‘आॅपरेशन’! धर्मादाय आयुक्तांनी वेशांतर करून केले ‘स्टिंग’

गरिबांना उपचार नाकारणा-या बड्या रुग्णालयांचे ‘आॅपरेशन’! धर्मादाय आयुक्तांनी वेशांतर करून केले ‘स्टिंग’

Next

- नंदकिशोर पाटील 
मुंबई : गरीब रुग्णांवरील उपचाराच्या नावाखाली सरकारच्या सवलती लाटणारी राज्यातील धर्मादाय रुग्णालये, गरीब रुग्णांना दारातही उभे करत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. राज्य धर्मादाय आयुक्तांनी स्वत: मुंबईतील नानावटी रुग्णालयाचे ‘स्टिंग आॅपरेशन’ करून, हे बिंग फोडल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
उच्च न्यायालयाने २००४ मध्ये दिलेल्या एका निकालानुसार, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अन्वये नोंदणी झालेल्या धर्मादाय रुग्णालयांनी, त्यांच्या उत्पन्नाच्या दोन टक्के रक्कम गरीब रुग्णांवर खर्च करणे बंधनकारक आहे. रुग्णांलयातील एकूण खाटांच्या दहा टक्के खाटा निर्धन रुग्णांसाठी राखीव ठेऊन, त्यांच्यावर मोफत उपचार करणे, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी पन्नास टक्के सवलतीच्या दरात उपचार करणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक धर्मादाय रुग्णांलये या नियमांचे सर्रास उल्लंघन करत असल्याच्या तक्रारी आहेत.
एका तक्रारीची खातरजमा करण्यासाठी धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी विलेपार्लेच्या नानावटी हॉस्पिटलचे १२ सप्टेंबर रोजी ‘स्टिंग आॅपरेशन’ केले! ‘मी गरीब असून, माझ्या छातीत दुखत आहे,’ म्हणून वेशांतर करून उपचारासाठी गेलेल्या आयुक्तांना ‘नानावटी’च्या कर्मचा-यांनी दाखल करून न घेता, आमच्याकडे गरीब रुग्णांसाठी कोणतीही सोय नसल्याचे सांगून त्यांना पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, धर्मादाय आयुक्तांनी आपली खरी ओळख सांगताच सगळ्यांचे धाबे दणाणले.
राज्यातील इतर धर्मादाय रुग्णालयांची अशीच तपासणी करण्यात येणार असून, दोषी रुग्णालयांची मान्यता रद्द करण्यात येणार आहे, अशी माहिती धर्मादाय आयुक्त कार्यालयातील सूत्रांनी दिली.

ओळख दाखविताच वळली बोबडी

डोक्यावर टोपी, अंगात मळका सदरा आणि पायघोळ पायजमा अशा वेशात, राज्य धर्मादाय आयुक्त डिगे यांनी वाहन चालकास सोबत घेऊन मंगळवारी सकाळी नानावटी हॉस्पिटल गाठले.
‘माझ्या छातीत दुखत आहे... मी गरीब माणूस आहे... माझ्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत...डॉक्टरांना दाखवायचे आहे...’ म्हणून त्यांनी विनंती केली, पण स्वागतकक्षात असलेल्या कर्मचाºयांनी त्यांना दाद दिली नाही. उलट इथे गरिबांसाठी सोय नसल्याचे सांगितले. रुग्णालयातील एका कोपºयात नावालाच असलेल्या सोशल वर्करच्या कार्यालयातही मदत मिळाली नाही.
धर्मादाय रुग्णालयांमध्ये शासननियुक्त आरोग्य सेवक असतो. नानावटीतील आरोग्य सेवकानेही मदत करण्यास असमर्थता दर्शविली. शेवटी आयुक्तांनी आपले ओळखपत्र दाखविताच कर्मचाºयांची बोबडी वळली.

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश बसविले धाब्यावर
गरिबांवर उपचार टाळल्यास धर्मादाय रुग्णालयांना देण्यात आलेल्या सवलती व मान्यता काढून घेण्यात येईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात बजावले होते. मात्र, तरीही गरीब रुग्णांना उपचार नाकारले जात आहेत.

सवलती का काढू नयेत?
राज्य धर्मादाय आयुक्तांनी डॉ. बालाभाई नानावटी रुग्णालयाच्या विश्वस्तांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. फौजदारी स्वरूपाची कारवाई का करू नये, तसेच रुग्णालयास मिळणाºया सवलती का काढू नयेत? असे नोटिसीत बजावले आहे.

मुंबईतील सर्व धर्मादाय रुग्णालयांमध्ये एकूण ८,६२५ खाटा आहेत. पैकी ८७६ खाटा गरीब रुग्णांसाठी, तर ८७४ खाटा दुर्बल घटकातील रुग्णांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. धर्मादाय आयुक्तांकडून याची तपासणी होणार आहे.

Web Title: Big hospitals' operation to refuse treatment of poor people! 'Sting' done by charity commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.