काम मोठे, मानधन तोकडे!

By admin | Published: May 29, 2015 01:51 AM2015-05-29T01:51:07+5:302015-05-29T01:51:07+5:30

१0 हजारांवर अंशकालीन स्त्री परिचरांची व्यथा; दरमहा केवळ १२00 रुपये मानधन.

Big job, monopoly monopoly! | काम मोठे, मानधन तोकडे!

काम मोठे, मानधन तोकडे!

Next

संतोष येलकर/अकोला: आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये काम करणार्‍या राज्यातील अंशकालीन स्त्री परिचरांवर कामाचा व्याप मोठा असला तरी, त्या मोबदल्यात दरमहा केवळ १ हजार २00 रुपये मानधन मिळत आहे. त्यामुळे काम मोठे आणि मानधन तोकडे, असा प्रत्यय राज्यातील १0 हजार ५८0 अंशकालीन स्त्री परिचरांना येत आहे.
राज्यातील जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्य उपकेंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या आरोग्यसेविका (एएनएम), अंशकालीन स्त्री परिचर (पीएलए) गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. गावपातळीवर काम करणार्‍या आरोग्यसेविकांसोबत राहून, गृहभेटी, लसीकरण, शस्त्रकिया कामात मदत, शल्यगृहाची साफसफाई, प्रसूतीगृहांची साफसफाई इत्यादी कामे अंशकालीन स्त्री परिचरांना करावी लागतात. राज्यात सद्यस्थितीत १0 हजार ५८0 अंशकालीन स्त्री परिचर कार्यरत आहेत. आरोग्य केंद्रांवर काम करणार्‍या या सर्व अंशकालीन स्त्री परिचरांना महिन्याकाठी केवळ १ हजार २00 रुपये मानधन दिले जात आहे. १९६६ पासून काम करणार्‍या अंशकालीन स्त्री परिचरांना प्रारंभी दरमहा २0 रुपये, ५0 रुपये, ८0 रुपये असे मानधन मिळत होते. सन २00२ मध्ये मानधनाची ही रक्कम दरमहा ३00 रुपये करण्यात आली, त्यानंतर प्रतिवर्ष शंभर रुपयांप्रमाणे मानधनात वाढ करण्यात आली व सद्यस्थितीत राज्यातील अंशकालीन स्त्री परिचरांना दरमहा १ हजार २00 रुपये इतके मानधन दिले जात आहे. कामाचा व्याप मोठा असला तरी, त्या तुलनेत मिळणारे दरमहा मानधन महागाईच्या काळात अत्यंत तोकडे आहे. दिवस असो वा रात्र, वर्षभर आरोग्य केंद्रामध्ये प्रसूति व इतर आरोग्यविषयक सुविधांच्या कामात मदत करणार्‍या अंशकालीन स्त्री परिचरांना मिळणार्‍या तोकड्या मानधनावर काम करणे कठीण झाले आहे. त्यामुळे दरमहा किमान १0 हजार रुपये मानधन मिळावे, यासाठी महाराष्ट्र राज्य अंशकालीन स्त्री परिचर संघटनेच्यावतीने शासन दरबारी संघर्ष केला जात आहे.
राज्यातील जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागांतर्गत १0 हजार ५८0 अंशकालीन स्त्री परिचर असून, सद्यस्थितीत त्यांना दरमहा १ हजार २00 रुपये प्रमाणे मानधन दिले जात आहे. ही मानधनाची रक्कम अत्यंत कमी आहे. आरोग्य केंद्रांमध्ये काम करणार्‍या अंशकालीन स्त्री परिचरांना दरमहा १0 हजार रुपये मानधन मिळावे, यासाठी महाराष्ट्र अंशकालीन परिचर महासंघाच्यावतीने शासन दरबारी संघर्ष सुरू असल्याचा महाराष्ट्र राज्य अंशकालीन स्त्री परिचर महासंघाच्या सरचिटणीस मंजुळा बांगर यांनी सांगीतले.



अमरावती विभागातील अंशकालीन स्त्री परिचर!
जिल्हा               अंशकालीन स्त्री परिचर
अकोला                   १७८
वाशिम                    १५३
अमरावती                ३३३
यवतमाळ                ४३५
बुलडाणा                  २८0
.........................
एकूण                     १३७९

*४0 रुपये रोज अन् खर्च जादा!
ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये काम करणार्‍या अंशकालीन स्त्री परिचरांना ४0 रुपये रोजाप्रमाणे दरमहा १ हजार २00 रुपये मानधन मिळत आहे. प्रवास भत्ता किंवा इतर कोणत्याही सुविधा नसल्याने, कामाच्या ठिकाणी जाणे-येणे व इतर खर्च अंशकालीन स्त्री परिचरांना स्वत:जवळूनच करावा लागतो. त्यामुळे मानधनापोटी ४0 रुपये रोज आणि खर्च जादा, अशा परिस्थितीत दिवस काढण्याची वेळ अंशकालीन स्त्री परिचरांवर आली आहे.

Web Title: Big job, monopoly monopoly!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.