कोकणातील बडा नेता अडचणीत; रमेश गोवेकर हत्येचा नव्याने तपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 06:03 AM2019-03-01T06:03:51+5:302019-03-01T06:04:04+5:30
सभापतींचे निर्देश : चौकशीचा मागे लागणार ससेमिरा
मुंबई : तेरा वर्षांपूर्वी मालवणमधून बेपत्ता झालेले शिवसैनिक रमेश गोवेकर यांचे काय झाले, याचा कोणताच खुलासा झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणाची
पुन्हा चौकशी करा, असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी गुरूवारी सरकारला दिले. या प्रकरणाची फाईल उघडण्याचा आग्रह लावून धरत निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेनेने कोकणातील एका बड्या प्रतिस्पर्धी नेत्याच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला आहे.
रमेश गोवेकर प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. मात्र या तपासातून काही उलघडा झाला नाही. परिणामी सीबीआयने तपास थांबवला होता. गहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी सीबीआयचा अहवाल सभागहाच्या पटलावर ठेवला. यावर, शिवसेना गटनेते अनिल परब यांनी
आक्षेप घेतला. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. मात्र, सदनात वारंवार तीच माहिती दिली जात आहे. याप्रकरणाचे कुठलेही धागेदोरे अद्याप हाती लागलेले नाहीत. याप्रकरणात एक मृतदेह हाती लागला होता. तो कुणाचा होता याचाही खुलासा झालेला नाही, असे सांगत या केसची फाईल पुन्हा उघडण्याची मागणी परब यांनी केली. यावर, सीबीआयच्या तपासाची माहिती सरकारने पटलावर ठेवली आहे. तरीही सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन गृहविभागाचे अतिरीक्त मुख्य सचिवांमार्फत ही केस उघडता येईल का, याचा विचार करू उत्तर गृहराज्यमंत्री केसरकर यांनी दिले.
चौकशीची फाईल पुन्हा उघडणार
गोवेकर प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्यासाठी गृहविभागाच्या अतिरीक्त मुख्य सचिवांमार्फत तातडीची बैठक घ्यावी. या बैठकीला सर्व आमदारांना बोलवावे. या बैठकीत ठोस निर्णय घ्यावा, असे निर्देश सभापतींनी स्वत:च्या अधिकाराखाली आदेश दिले.