साखर कारखान्यांच्या खरेदी घोटाळ्यात बडे नेते गोत्यात

By admin | Published: January 3, 2017 11:58 PM2017-01-03T23:58:31+5:302017-01-03T23:58:31+5:30

डबघाईला आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या साखर कारखाने कवडीमोल भावाने विकत घेऊन वरील मलई खाणारे बडे नेते चांगलेच गोत्यात येण्याची शक्यता आहे.

Big leaders in the purchase of sugar factories scam | साखर कारखान्यांच्या खरेदी घोटाळ्यात बडे नेते गोत्यात

साखर कारखान्यांच्या खरेदी घोटाळ्यात बडे नेते गोत्यात

Next

मुंबई : डबघाईला आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या साखर कारखाने कवडीमोल भावाने विकत घेऊन वरील मलई खाणारे बडे नेते चांगलेच गोत्यात येण्याची शक्यता आहे. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी या सर्व बड्या नेत्यांवर एफआआयआर नोंदवण्याची व या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राजु शेट्टी यांच्या याचिकेमुळे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे दोन्ही सुपुत्र निखील आणि सारंग गडकरी, तसेचपंकज व समीर भुजबळ, एकनाथ खडसेंच्या पत्नी, अशोक चव्हाणांचे जवळचे नातेवाईक आणि अजित पवार व त्यांचे नातेवाईक अडचणीत येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांना डबघाईस आणून अल्पदरात विकत घेऊन स्वत:चे खिसे गरम करण्याचा सपाटा राजकारण्यांनी लावला आहे. त्यात काही बडे नेते प्रत्यक्ष सहभागी नसले तरी त्यांचे सख्खे नातेवाईक किंवा त्यांच्या कार्यालयातील बड्या अधिकाऱ्याच्या नावे हे कारखाने खरेदी करून कोट्यवधी रुपयांचा नफा कमावण्यात येत आहे आणि गरीब शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे साखर कारखाने कवडीमोल भावाने विकत घेणाऱ्या संबंधित कंपन्यांच्या संचालकांवर एफआयआर नोंदवावा तसेच या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारला विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारी याचिका खासदार राजू शेट्टी यांनी अ‍ॅड. सतीश बोरुळकर, योगेश पांडे आणि अ‍ॅड. संदीप कोरेगावे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
याचिकेनुसार, साखर कारखाने चालवण्याच्या नावाखाली बडे नेतेमंडळी कोट्यवधी रुपयांचे कर्ज महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून घेतात. परंतु, कारखाने डबघाईला आल्याचे दाखवून कर्जाची परतफेड करत नाही. त्यामुळे या कर्जाची वसुली करण्यासाठी संबंधित कायद्यांतर्गत डबघाईला आलेल्या साखर कारखान्याच्या संपत्तीची मोजदाद करते. त्यांची किंमत लावते. सहकारी बँक जाणुनबुजून संबंधित साखर कारखान्यांच्या संपत्ती किंमत वास्तविक असलेल्या किंमतीपेक्षा कमी लावते. खरेदी करणारी कंपनी आणि बँकेचे अधिकारी जाणुनबुजून असा प्रकार करत असल्याचा आरोप शेट्टी यांनी याचिकेद्वारे केला आहे.
‘अंबादेवी सहकारी साखर कारण्याची किंमत १०० कोटी रुपये असतानाही महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने हा कारखाना अवघ्या १५ कोटी रुपयांना मुंबईच्या कायनेटीक प्रट्रोलियम प्रा. लि. ला विकला. अशाच प्रकारे राज्यातील अनेक साखर कारखान्यांची किंमत कमी लावून शेतकऱ्यांना फसवण्यात आले. याबद्दल पोलिसांकडे तक्रार करूनही पोलिसांनी काहीही दखल घेतली नाही. याबाबतीत प्राथमिक चौकशी करण्यात आली व चौकशीअंती दखलपात्र गुन्हा असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊनही पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नाही,’ असे शेट्टी यांनी याचिकेत म्हटले आहे.
अशासंदर्भातील जनहित याचिका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उच्च न्यायालयात दाखल केल्याने बडे नेते अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या याचिकेवरील सुनावणी याच आठवड्यात होण्याची शक्यता
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Big leaders in the purchase of sugar factories scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.