मोठी बातमी: बच्चू कडूंकडून दिव्यांग मंत्रालयाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; CM फडणवीसांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 18:05 IST2025-01-03T18:02:18+5:302025-01-03T18:05:42+5:30

दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी मला आंदोलने करावी लागणार असून पदावर राहून आंदोलन करणे शक्य नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

Big news Bachchu Kadu resigns from the post of Chairman of the Ministry of Disabled Letter to CM devendra Fadnavis | मोठी बातमी: बच्चू कडूंकडून दिव्यांग मंत्रालयाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; CM फडणवीसांना पत्र

मोठी बातमी: बच्चू कडूंकडून दिव्यांग मंत्रालयाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; CM फडणवीसांना पत्र

Bacchu Kadu: प्रहारचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या पदावर राहून मला दिव्यांगांना न्याय देईल असं वाटत नाही, दिव्यांगांना न्याय देण्यासाठी आता आंदोलन करावे लागणार असल्याचं सांगत बच्चू कडू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत कडू यांनी  राजीनामा सोपवला आहे.

बच्चू कडू यांनी म्हटलं आहे की, "भारतातले पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात निर्माण केल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार. परंतु अद्यापपर्यंत दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रालयाचे काम सुरू झाले नाही. पदावर राहून हे काम होणार, अशी शक्यता मला मावळता दिसत आहे. दिव्यांगासोबत बेईमानी मला शक्य नाही. त्यामुळे मी माझा दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान, अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. तो मंजूर करुन सहकार्य करावे, तसेच मला असलेली सुरक्षाही काढून टाकावी व कुठलीही सुरक्षा देण्यात येऊ नये," अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.

बच्चू कडू यांच्या पत्रात कोणते मुद्दे?

दिव्यांगांबाबत राज्य सरकारकडून अपेक्षित पावलं टाकण्यात येत नसल्याचं सांगत बच्चू कडू यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. "दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले परंतु, १. इतर राज्यांपेक्षा दिव्यांगांना महाराष्ट्रामध्ये मिळणारे मानधन सर्वांत कमी आहे. २. मिळणारे मानधन वेळेवर कधीच मिळत नाही. ३. स्थानिक स्वराज्य संस्था ५ टक्के निधी खर्च करत नाही. ४. अजूनही स्वतंत्र मंत्री नाही आणि सचिव पण नाही. ५. जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र कार्यालय नाही आणि पद भरती नाही. ६. इतर अनेक गोष्टी ज्या झाल्या नाहीत आणि या पदावर राहून ते होणार अशी शक्यता मावळली आहे. म्हणून दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी मला आंदोलने करावी लागणार असून पदावर राहून आंदोलन करणे शक्य नाही, दिव्यांगासोबत बेईमानी कदापि शक्य नाही. म्हणून मी माझा राजीनामा देत आहे. तो मंजूर करून सहकार्य करावे, तसेच मला असलेली सुरक्षा काढून टाकावी आणि कुठलीही सुरक्षा ठेवण्यात येऊ नये," अशी भूमिका बच्चू कडू यांनी मांडली आहे.

दरम्यान, बच्चू कडू यांचा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असून त्यांनी दिव्यांग आणि शेतकरी प्रश्नावरून आता सरकारविरोधात संघर्ष करण्याची भूमिका निश्चित केल्याचे दिसत आहे.  

Web Title: Big news Bachchu Kadu resigns from the post of Chairman of the Ministry of Disabled Letter to CM devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.