मोठी बातमी : येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांची विक्री आणि वाजविण्यास बंदी; राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 12:57 AM2020-11-10T00:57:29+5:302020-11-10T01:03:18+5:30
फटाके विक्री आणि वाजवून नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आकारण्यात येणार आहे.
पुणे : फटाक्यांमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाचा थेट परिणाम फुफ्फुसांवर होतो. कोरोनाचाही श्वसनाच्या विकारांशी थेट संबंध असल्याने नागरिकांचे हित लक्षात घेऊन राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) पुण्यासह देशातील सर्व प्रदूषित शहरांमध्ये या वर्षी दिवाळीमध्ये फटाक्यांवर बंदीचे आदेश दिले आहेत. येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांची विक्री आणि फटाके वाजविण्यास बंदी असून नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाला सामोरे जावे लागणार आहे.
दिल्लीतील हवा प्रदूषणामुळे गेल्या काही दिवसात कोरोनाचे रुग्ण वाढले असल्याची दखल घेत दिल्ली, राजस्थान, कर्नाटकसह काही राज्यांनी दिवाळीमध्ये फटका उडविण्यावर बंदी घातली. याच धर्तीवर इतर राज्यांकडूनही फटाक्यांवर बंदी घालण्यासंदर्भात एनजीटीकडे याचिका दाखल झाल्या . या संदर्भात सोमवारी झालेल्या सुनावणी दरम्यान एनजीटीचे अध्यक्ष न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल यांच्या मुख्य न्यायपीठाने हे प्रदूषित शहरांमध्ये फटाके बंदीचे आदेश दिले आहेत.
गेल्या वर्षभरात ज्या शहरांमध्ये हवेचा दर्जा वाईट आणि समाधानकारक पेक्षाही कमी (मॉडरेट) आहे, अशा सर्व शहरांमध्ये या दिवाळीत फटाके विक्री आणि फटाके वाजविण्यास बंदी लागू झाली आहे. या निकषानुसार महाराष्ट्रातील सतरा शहरांचा या बंदीच्या यादीत समावेश आहे. दिवाळीच्या चार दिवसात दरवर्षी शहरांमधील हवेची गुणवत्ता ढासळते, या काळात श्वसनाचेही आजार वाढतात. फटाक्यांच्या प्रदूषणामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच या आजारातून बरे झालेल्या रुग्णांनाही फटाक्यांच्या प्रदूषणाचा धोका होऊ शकतो, असे निर्देशित करत एनजीटीने फटाक्यांच्या बंदीचे आदेश दिले आहेत. फटाके विक्री केल्यास दहा हजार तर फटाके वाजविल्यास दोन हजाराचा दंड करण्यात येणार आहे.
.....
सतरा शहरांमध्ये फटाक्यांवर बंदी लागू करण्याचे आदेश
महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर, ठाणे, उल्हासनगर या सतरा शहरांमध्ये वर्षभरातील हवाप्रदूषण हे सरासरी मध्यम (मॉडरेट) गुणवत्तेपेक्षा जास्त किंवा सम पातळी नोंदवले जात आहे. त्यामुळे या सर्व शहरात फटाक्यांवर बंदी लागू करावी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी याची अंमलजावणी करावी असे एनजीटीने म्हटले आहे.
......
ज्या शहरांमधील हवेचा दर्जा वाईट आणि मध्यम या श्रेणीतील आहे, त्यांना फटाक्यांवर बंदी घालण्याचे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकारणाने प्रशासनाला दिले आहेत. ज्या शहरांमध्ये प्रदूषण कमी आहे, तेथे स्थानिक स्वराज्य संस्थांनी योग्य तो निर्णय घ्यावा, असे आदेशात नमूद केले आहे. देशातील सर्वाधिक हवेचे प्रदूषण असलेल्या शहरांमध्ये पुण्याचा देखील समावेश होतो, त्यामुळे फटाके बंदीचा आदेश पुण्याला लागू आहे.
जितेंद्र सांगेवार, प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ