CoronaVirus News: मोठी बातमी! कोरोना चाचणीचे दर चौथ्यांदा कमी झाले; आरोग्य मंत्र्यांची घोषणा
By हेमंत बावकर | Published: October 26, 2020 04:56 PM2020-10-26T16:56:08+5:302020-10-26T16:57:30+5:30
Corona Test Rates: सरकारी लॅबमध्ये सर्व चाचण्या मोफत आहेत. मात्र, खासगी लॅबमध्ये पैसे आकारले जातात. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी हे दर कमी करण्यात आले आहेत, असे टोपे म्हणाले.
मुंबई : राज्यातील कोरोना चाचणीचे दर तिसऱ्यांदा कमी करण्यात आले आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याची घोषणा केली. तसेच आजच जीआर काढणार असून टेस्टिंग लॅबनी दरात बदल करावेत असे आवाहन त्यांनी केले आहे.
सरकारी लॅबमध्ये सर्व चाचण्या मोफत आहेत. मात्र, खासगी लॅबमध्ये पैसे आकारले जातात. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी हे दर कमी करण्यात आले आहेत, असे टोपे म्हणाले. शिवाय कोरोना चाचण्यांची संख्या वाढावी हा त्यामागचा उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रति दहा लाख लोकसंख्येमागे 70 हजार चाचण्या करत आहोत. ही संख्या वाढवायची आहे. केंद्र सरकारने 4500 चा दर दिला होता. तो 2200 रुपयांवर आणला होता. तो पुन्हा 1200 वर आणला आणि आता हा दर 980 रुपयांवर आणला आहे, असे टोपे म्हणाले.
कोरोना चाचणीच्या दरांचे नवीन स्लॅब हे आजपासून लागू झाले असून जिल्हाधिकारी, आयुक्तांनी याकडे लक्ष द्यावे. जास्तीचे दर आकारले तर ते कायद्याला धरून असणार नाहीत. लॅबमध्ये जाऊन चाचणी केल्यास 980 रुपये, जे हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णांचे स्वॅब घेतात त्यांच्यासाठी 1400 रुपये आणि जे घरी येऊन चाचण्या घेतात इतर खर्च करतात पीपीई किटसाठी खर्च करतात त्यांच्यासाठी 1800 रुपये आकारले जाणार आहेत, असे टोपे यांनी सांगितले. सर्व टेस्टिंग लॅबने याची दखल घ्यावी आणि कमी केलेले दर आकारावेत, अशी विनंती टोपे यांनी केली.
राज्यात #कोरोना चाचण्यांच्या दरात चौथ्यांदा घट. खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे दर प्रति तपासणी सुमारे २०० रुपयांनी केले कमी. नव्या दरानुसार चाचण्यांसाठी ९८०, १४०० आणि १८०० रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक- आरोग्यमंत्री @rajeshtope11pic.twitter.com/jOWdZbZ5DE
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 26, 2020
याआधी ७ सप्टेंबरला कोरोनाचे दर कमी करण्यात आले होते. हे दर 1200 रुपयांपासून सुरु होत होते. सध्याचे दर असे होते.
कोविड केअर सेंटर्स, हॉस्पिटल, क्लिनिक, क्वॉरंटाईन सेंटर्समध्ये स्वॅब दिल्यास 1600 रुपये आकारले जातात. यासाठी आधी 2200 रुपये आकारले जात होते. तर कलेक्शन साईटवर म्हणजेच कोव्हीड व्हॅन किंवा कॅम्प आदी ठिकाणी सॅम्पल दिल्यास यासाठी 1200 रुपये आकारले जात आहेत. यासाठी आधी 1900 रुपये आकारले जात होते. तर कोरोना सदृष्य रुग्णाच्या घरी जाऊन सॅम्पल घेतल्यास 2000 रुपये आकारले जात होते. यामध्ये कपात करण्यात आली आहे.