मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी कोल्हापूर दौरा रद्द केला; स्थानिकांची काळे झेंडे, बाजारपेठा बंद ठेवण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 02:34 PM2024-06-24T14:34:11+5:302024-06-24T14:36:02+5:30
शक्तीपीठ महामार्गाला विरोध असताना शिंदेंनी तो रद्द न करता या मार्गाचे फेरसर्वेक्षण करण्याचे म्हटले होते. यामुळे चळवळींचा जिल्हा अशी ओळख असलेल्या कोल्हापूरात शेतकऱ्यांसह सर्वच स्तरांतून शिंदेंच्या दौऱ्याला विरोध होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध स्थानिक संघटनांचा विरोध पाहून कोल्हापूर दौरा रद्द केला आहे. मंगळवारी ते कोल्हापूर शास्वत विकास परिषदेसाठी येणार होते. परंतू, मुख्यमंत्र्यांनी हद्दावाढ, सर्किट बेंचसह आधीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली होती. तसेच मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यात येणार होते.
हद्दवाढ कृती समितीच्या रविवारी झालेल्या बैठकीत मंगळवारी कोल्हापूर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. माजी महापौर आर. के. पोवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती. तसेच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाला विऱोध होत असून शिंदे यांना मोर्चाद्वारे जाब विचारण्याचा इशाराही देण्यात आला होता. मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यावेळी कोल्हापूर कडकडीत बंद करण्यासाठी मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता बिंदू चौकात एकत्र येऊ. तेथून शहरात मोटारसायकल रॅली काढून बंद यशस्वी करण्यासाठी आवाहन करू, याशिवाय मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांचे पोस्टर तयार करून त्याला काळे फासू, पोलिसांचे कडे तोडून मुख्यमंत्री शिंदे यांना काळे झेंडे दाखवू, असे या बैठकीत ठरविण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. शाश्वत परिषदेला शिंदे ऑनलाईन हजर राहणार आहेत. शक्तीपीठ महामार्गाला विरोध असताना शिंदेंनी तो रद्द न करता या मार्गाचे फेरसर्वेक्षण करण्याचे म्हटले होते. यामुळे चळवळींचा जिल्हा अशी ओळख असलेल्या कोल्हापूरात शेतकऱ्यांसह सर्वच स्तरांतून शिंदेंच्या दौऱ्याला विरोध होत आहे.
अशास्वत सरकारकडून शास्वत परिषद कसली?
अॅड. इंदूलकर म्हणाले, शिंदे यांचे सरकारच आहेत. एक फूल दोन हाफचे सरकार आहे. यांचे सरकारच अशास्वत असताना शास्वत विकास परिषद कसली घेता? विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने शास्वत विकासाचे गाजर दाखवले आहे. शासनाचा हा फुगा आहे.