मोठी बातमी: विधानसभेसाठी भाजपच्या ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; मुहूर्त ठरला!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 01:28 PM2024-09-19T13:28:40+5:302024-09-19T13:30:56+5:30
भाजपच्या कोअर कमिटी आणि निवडणूक समितीची २३ सप्टेंबर आणि २४ सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
BJP Maharashtra Vidhan Sabha ( Marathi News ) : विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यास अवघे काही दिवस बाकी असल्याने महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपाची बोलणी सुरू असतानाच काही पक्षांकडून उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. भाजपच्या कोअर कमिटी आणि निवडणूक समितीची २३ सप्टेंबर आणि २४ सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण बैठक होणार असून लवकरच ५० उमेदवारांची पहिली यादीही जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, २३ आणि २४ सप्टेंबरला भाजपच्या प्रमुख नेत्यांची मॅरेथॉन बैठक होईल. या बैठकीला भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि अन्य नेते उपस्थित असतील. या बैठकीमध्ये उमेदवारांच्या पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब होईल आणि पितृपक्ष संपल्यानंतर ही यादी जाहीर केली जाणार आहे.
दरम्यान, भाजपकडून ५० उमेदवारांच्या पहिल्या यादीत बहुतांश विद्यमान आमदारांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. विद्यमान आमदारांसह कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महाविकास आघाडीच्या गोटातही हालचाली
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनेही जागा वाटपाच्या चर्चेला बुधवारी सुरुवात केली आहे. तीनही पक्षांनी विभागवार आपले अहवाल बैठकीत मांडले. ही चर्चा सलग तीन दिवस सुरू राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रत्येक विभागात सध्या कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला कोणत्या विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली होती. तसेच प्रत्येक मतदारसंघात तीन प्रमुख पक्षांकडून इच्छुक उमेदवार कोण आहेत यावर बैठकीत प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते. कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाची ताकद जास्त आहे, तसेच कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो हा निकष समोर ठेवून जागा वाटप करण्यावर या बैठकीत चर्चा झाली. काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शरद पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड तर उद्धव सेनेकडून नेते संजय राऊत आणि अनिल देसाई उपस्थित होते.