मोठी बातमी: पवारांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; प्रवक्त्याच्या सूचक पोस्टने चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 11:11 AM2024-06-12T11:11:23+5:302024-06-12T11:13:49+5:30
पक्षातील दोन नेत्यांमध्ये अप्रत्यक्षरित्या कलगीतुरा रंगलेला असताना आता यामध्ये प्रवक्त्यांनीही उडी घेतल्याचं दिसत आहे.
Sharad Pawar NCP ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला महाराष्ट्रात चांगलं यश मिळालं असलं तरी निवडणूक निकालानंतर पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांनी कोणत्याही नेत्याचं नाव न घेता पक्षात सुरू असलेल्या काही गोष्टींबाबत आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भाषणातून कोणत्याही नेत्याने अंतर्गत गोष्टींवरची भूमिका जाहीरपणे मांडू नये, अशी सूचना केली. या दोन्ही नेत्यांमध्ये अप्रत्यक्षरित्या कलगीतुरा रंगलेला असताना आता यामध्ये प्रवक्त्यांनीही उडी घेतल्याचं दिसत आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आणि रोहित पवारांचे विश्वासू अशी ओळख असणाऱ्या विकास लवांडे यांनी ६ जून रोजी एक पोस्ट लिहीत पक्षाच्या प्रदेश पातळीवरील नेतृत्वात खांदेपालट करण्यात यावा, अशी मागणी केली होती. "निष्ठावान, लढाऊ नेते शशिकांत शिंदे आणि युवा आमदार रोहित पवार यांच्यावर प्रदेश संघटनेची मुख्य जबाबदारी देण्यात यावी. तसंच राष्ट्रीय पातळीवर सर्वांना सोबत घेऊन पक्ष संघटना वाढवली पाहिजे," असं लवांडे यांनी म्हटलं होतं. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी अप्रत्यक्षपणे प्रदेशाध्यक्षपदावर भाष्य केल्यानंतर आता जयंत पाटील यांच्या गोटातूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
जयंत पाटील यांचे खंदे समर्थक आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अॅड. भूषण राऊत यांनीही सोशल मीडियावर पोस्ट लिहीत प्रदेशाध्यक्षपदाची मागणी करणाऱ्यांवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. "राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळणे हे कोंबड्या पाळण्याइतके सोप्पे नाही," असा टोला भूषण राऊत यांनी लगावला आहे. रोहित पवार हे बारामती अॅग्रो या आपल्या कंपनीच्या माध्यमातून कोंबड्यांचा व्यवसाय करत असल्याने भूषण राऊत यांनी त्यांना उद्देशूनच हा टोला लगावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळणे कोंबड्या पाळण्याइतके सोप्पे नाहीये…
— Adv. Bhushan Raut - अॅड. भूषण राऊत (@AdvBhushanRaut) June 11, 2024
जाहीर व्यासपीठावरून जयंत पाटलांनी काय आवाहन केलं?
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अहमदनगर इथं आयोजित सभेत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "माझ्या प्रदेशाध्यक्षपदाचे महिने याआधी अनेकांनी मोजून झाले आहेत. आता पुढचे चार महिने मोजू नका. कारण आता निवडणूक आहे. जाहीरपणे बोलायचे बंद करा. काही तक्रार असेल तर शरद पवार यांना भेटून ती तक्रार करा. त्यावर ते आमच्या दोन कानाखाली मारतील, नाहीतर त्यांना योग्य वाटेल तो निर्णय घेतील. फक्त ट्विटरवर वगैरे बोलणं बंद करा," असं आवाहन पाटील यांनी केलं.
"मी सगळो नीट करतो. पक्ष ही कोणा एकाची संपत्ती नाही, महाराष्ट्रातील लाखो लोकांचा हा पक्ष आहे. मी चुकीचो वागलो तर सगळ्या महाराष्ट्रातील जनतेवर याचा परिणाम होणार, याचं भान ठेवून आपण सगळ्यांनी वागू. पुढील चार महिने आपण एका दिलाने राहू. नोव्हेंबरनंतर मीच प्रदेशाध्यक्ष म्हणून नमस्कार करेन. पण तोपर्यंत जाहीरपणे आणि खासगीतही चर्चा करू नका. काही सूचना असतील तर मला येऊन सांगा. लोकसभेत झालेला विजय हा माझ्या एकट्याचा नाही. हे टीम वर्क आहे. त्यामुळे चिंता करू नका, विधानसभेतही आपल्या बाजूनेच निकाल येईल," असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.