मोठी बातमी: राज्य सरकारमधील मंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 03:12 PM2022-02-11T15:12:21+5:302022-02-11T15:13:12+5:30
Bachchu Kadu : राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील अजून एक मंत्री अडचणीत आले आहेत. राज्य सरकारमधील महिला बालकल्याण आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोर्टाने दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
अमरावती - राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील अजून एक मंत्री अडचणीत आले आहेत. राज्य सरकारमधील महिला बालकल्याण आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोर्टाने दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवल्याप्रकरणी बच्चू कडू यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणी भाजपाचे तत्कालीन नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी २०१७ मध्ये बच्चू कडू यांच्याविरोधात तक्रार दिली होती. त्यावर न्यायालयीन सुनावणी झाल्यानंतर या प्रकरणाचा आज निकाला आला आहे. त्या चांदूरबाजार येथील प्रथमवर्ग न्यायालयाने बच्चू कडू यांना दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
बच्चू कडू यांच्याकडे मुंबईत सुमारे ४२ लाख ४६ हजार रुपयांचा स्वत:च्या मालकीचा फ्लॅट होता. मात्र २०१४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडुकीत त्यांनी या फ्लॅटची माहिती लपवून ठेवली होती. दरम्यान, त्यावरून तक्रार करणारे गोपाल तिरमारे यांनी माहितीच्या अधिकारामधून याबाबतची माहिती मिळवली होती. त्याआधारावर त्यांनी बच्चू कडू यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या शपथपत्रात अंधेरी येथे 2011 मध्ये सदनिका विकत घेतली परंतु ही माहिती त्यांनी शपथ पत्रात दडविली होती. या गंभीर प्रकरणी चांदूरबाजार तालुक्याचे भाजप सरचिटणीस गोपाल तिरमारे यांनी 27 डिसेंबर 2017 रोजी आसेगाव पोलिसात तक्रार दिली होती या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी लोकप्रतिनिधी कायदा कलम 125 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पाच वर्षांनी शुक्रवारी चांदूरबाजार येथील प्रथम श्रेणी दिवाणी न्यायालय क्रमांक १ यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांची शिक्षा आणि २५ हजारांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणी सरकारी वकील वानखडे यांनी बाजू मांडली.