मोठी बातमी: लोकसभेच्या दोन महत्त्वाच्या जागांवर मविआतील तिढा सुटला; कुठून कोण लढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 05:11 PM2024-03-05T17:11:36+5:302024-03-05T17:13:48+5:30
मतदारसंघातील स्थिती लक्षात घेऊन सदर जागा कोणाला मिळणार, याचं सूत्र ठरवावं, यावर तीनही पक्षांचं एकमत झालं आहे.
Mahavikas Aghadi ( Marathi News ) : लोकसभेच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे या दोन्ही पक्षांना मागील लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या आपल्या काही जागा सोडाव्या लागणार आहे. मतदारसंघातील स्थिती लक्षात घेऊन ती जागा कोणाला मिळणार, याचे सूत्र ठरवावं, यावर तीनही पक्षांचं एकमत झालं आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव आणि कोल्हापूरच्या जागेबाबत मविआकडून कोण लढणार, यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. जळगावची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला तर कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडण्याचे निश्चित झाल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसची कोल्हापूर जिल्ह्यातील ताकद लक्षात घेत महाविकास आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ आपल्याला मिळावा, यासाठी काँग्रेस नेते आग्रही होते. त्यामुळे ही जागा काँग्रेसला सोडण्यात आली असून त्याबदल्यात सांगलीची जागा काँग्रेसकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिली जाणार आहे. तर जळगावची जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दिली जाणार असून मशाल चिन्हावर हर्षल माने हे मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, जळगाव, सांगली आणि कोल्हापूरच्या जागेचा तिढा जवळपास सुटला असला तरी सात ते आठ जागांबाबत मविआमध्ये अजूनही खलबतं सुरू असल्याचे समजते.
कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती लढणार
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आपल्या चाणाक्ष राजकीय डावपेचांसाठी ओळखले जातात. संकटात संधी निर्माण करत पवार यांनी याआधी अनेकदा मतदारसंघांची राजकीय गणिते बदलून दाखवली आहेत. अशातच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पुन्हा सक्रिय झाले असून महाविकास आघाडीची शक्ती कमी असलेल्या मतदारसंघांमध्ये नवे उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी शाहू महाराज छत्रपती यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीनंतर शाहू महाराज मविआकडून लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार झाले असल्याचे दिसत आहे. स्वत: शाहू महाराजांनी विविध कार्यक्रमांमध्ये बोलताना याबाबतचे संकेत दिले आहेत. मविआच्या जागावाटपात कोल्हापूरची जागा काँग्रेसकडे जाण्याची शक्यता असल्याने शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात.