मोठी बातमी! आता पांढऱ्या रेशन कार्ड धारकांवरही ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 05:09 PM2024-06-19T17:09:06+5:302024-06-19T17:09:24+5:30
राज्यातील सर्व जनतेला आयुष्यमान भारत सारख्या महात्मा फुले आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते.
गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जनतेला आयुष्यमान भारत सारख्या महात्मा फुले आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्याचे जाहीर केले होते. याच्या तयारीला सुरुवात झाली असून पांढरे रेशन कार्ड धारकांना सुद्धा महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे.
शुभ्र शिधापत्रिका आधार कार्डसोबत संलग्न करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यासाठी सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी, सर्व उपनियंत्रक शिधावाटप यांना रेशन कार्डचे आधारशी जोडणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २०१९ च्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये २०२३ मध्ये सुधारणा करण्यात आली होती. यानुसार आरोग्य विमा योजनेचा लाभ हा शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना देखील देण्यात येणार आहे.
या कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता आयुष्यमान कार्ड तयार करण्यासाठी सदर शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे. शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न (Aadhar Seeded) करण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश काढण्यात आले आहेत.
या आरोग्य योजनेनुसार या योजनेशी संलग्न सर्व नागरिकांना पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत दिले जाणार आहेत. यामध्ये सरकारी आणि खासगी रुग्णालये येतात. शहरे तसेच निमशहरी भागातील हॉस्पिटलमध्ये हे उपचार दिले जातात.