लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी: लाभ न मिळालेल्या महिलांसाठी सरकार लवकरच घेणार निर्णय?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 02:54 PM2024-09-02T14:54:23+5:302024-09-02T14:55:39+5:30
अर्ज न केलेल्या महिला या योजनेपासून वंचित राहू नयेत, यासाठी सरकार लवकरच महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
CM Ladki Bahin Yojana Maharashtra ( Marathi News ) : राज्यात मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. या योजनेसाठी आतापर्यंत लाखो महिलांनी अर्ज केला आहे. मात्र या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपली. परंतु अजूनही अनेक पात्र महिला या योजनेपासून वंचित आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारकडून लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे.
सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत दिली होती. परंतु २१ ते ६५ या वयोगटातील पात्र असलेल्या मात्र अद्याप अर्ज न केलेल्या महिला या योजनेपासून वंचित राहू नयेत, यासाठी सरकार लवकरच अर्ज करण्याची मुदत आणखी एका महिन्याने वाढवणार असल्याचे समजते. सरकारने हा निर्णय घेतल्यास लाखो महिलांना दिलासा मिळणार आहे.
पैसे आले नाहीत हे करा:
- बँक खात्यात पैसे येण्यासाठी आधार नंबर आणि बँक खाते एकमेकांशी लिंक असणे गरजेचे आहे.
- तसे नसल्यास महिलांना लाभ मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर महिलांनी आपले 'बँक सिडिंग' स्टेटस चेक करावे.
- आधार क्रमांक आणि बँक खाते एकमेकांशी लिंक नसतील तर ते लवकरात लवकर करून घ्यावे.
- त्यानंतरच तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील.
- बँक सिडिंग स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला https://uidai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
- वरील वेबसाईटवर आधारकार्ड नंबर टाकून कॅपच्या टाकून लॉगीन करा व आधार सिडिंग स्टेटस मध्ये जाऊन आधार कोणत्या बँकेला सीड आहे ते पाहता येईल.
आधार लिंक असलेल्या दुसऱ्याच बँक खात्यावर पैसे:
१) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत अर्ज करताना बैंक खाते क्रमांक टाकून पासबुक अॅपलोड केले. मात्र, हे बँक खाते आधारशी लिक नव्हते, तर अन्य बँक खाते आधारशी लिंक होते.
२) त्यामुळे पैसे त्या खात्यावर वर्ग झाल्याचे काही लाभार्थी महिलांनी सांगितले. त्यामुळे अर्ज करण्याअगोदर आपले आधारकार्ड कोणत्या बँक खात्याशी संलग्न आहे हे
तपासून घ्यावे.