मोठी बातमी: वंचितकडून बारामतीत सुळेंना पाठिंबा, पुण्यात वसंत मोरेंना उमेदवारी; ५ नवे उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 09:02 PM2024-04-02T21:02:48+5:302024-04-02T21:04:35+5:30
Supriya Sule Baramati: काँग्रेसच्या दोन उमेदवारांना पाठिंबा दिल्यानंतर वंचितने आज सुप्रिया सुळे यांच्या रुपाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारालाही पाठिंबा दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
VBA Prakash Ambedkar ( Marathi News ) :वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी आज आपली तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीत वंचितने पाच मतदारसंघांतील आपले उमेदवार जाहीर केले असून बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून मैदानात उतरलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसंच पुण्यातून वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी घोषित केली आहे.
वंचितने आज उमेदवार जाहीर केलेल्या मतदारसंघांमध्ये परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद), पुणे आणि शिरूर या पाच जागांचा समावेश आहे. शिरूरमधून वंचितने मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिली आहे. मंगलदास बांदल हे मागील लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. मात्र मागील काही दिवसांपासून ते भाजपच्या स्टेजवर दिसत होते. तसंच त्यांनी नुकतीच भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. परंतु आता वंचित आघाडीने त्यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. शिरूरमध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात सामना रंगत असताना आणखी एका उमेदवाराची एंट्री झाल्याने शिरूरची लढत तिरंगी होणार आहे.
The Vanchit Bahujan Aaghadi is pleased to declare its third list of candidates from Maharashtra for the Lok Sabha elections.
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) April 2, 2024
The VBA State Committee has decided to support the candidate of Nationalist Congress Party (Sharadchandra Pawar) from Baramati. pic.twitter.com/y587dUqLle
दरम्यान, वंचित आघाडीने आपण महाविकास आघाडीत समाविष्ट होणार नसलो तरी काँग्रेसला राज्यातील सात मतदारसंघांमध्ये पाठिंबा देऊ, अशी घोषणा केली होती. मात्र आज सुप्रिया सुळे यांच्या रुपाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारालाही वंचितने पाठिंबा दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.