मोठी बातमी! ITI विद्यार्थ्यांच्या मासिक विद्यावेतनात ५०० रुपयांपर्यंत वाढीचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 03:59 PM2022-12-26T15:59:52+5:302022-12-26T16:00:22+5:30
या विद्यावेतनात ५०० रुपयांपर्यंत वाढीचा प्रस्ताव असून येत्या ३ महिन्यात मंत्रिमंडळ बैठकीत याला मंजुरी मिळेल अशी माहिती मंत्र्यांनी दिली.
नागपूर - महाराष्ट्रातील ४१८ शासकीय आयटीआयच्या नूतनीकरणासाठी १२०० कोटीच्या प्रस्तावाची मागणी केली आहे. ज्याची अंमलबजावणी पुढील ६ महिन्यापर्यंत पूर्ण केली जाईल. तसेच विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ देणार नाही असं आश्वासन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानपरिषदेत दिले.
राज्यातील हजारो विद्यार्थी ITI मध्ये शिक्षण घेत असतात. या मुलांना विद्यावेतन म्हणून १९८६ पासून मासिक ४० रुपये देण्यात येत आहेत. या विद्यावेतनात ५०० रुपयांपर्यंत वाढीचा प्रस्ताव असून येत्या ३ महिन्यात मंत्रिमंडळ बैठकीत याला मंजुरी मिळेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. त्याचसोबत आयटीआयमध्ये नवीन कोर्स समाविष्य करण्याबाबत पुढील वर्षी घोषणा करू असंही मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत माहिती दिली.
मंगलप्रभात लोढा म्हणाले की, राज्यातील ३६ जिल्ह्यांसाठी एका कमिटीची स्थापना करून त्या जिल्ह्यात ज्या कंपन्या आहेत. तिथे आवश्यक असणारे स्किलसाठीचे कोर्स घेतले जातील आणि त्यारितीने मुलांना प्रशिक्षण दिले जाईल असं त्यांनी सांगितले. विधान परिषदेत विक्रम काळे, सुधीर तांबे, सतिश चव्हाण आणि बाळाराम पाटील यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनवाढीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला मंत्री लोढा यांनी उत्तर दिले.