Ladki Bahin Yojna: मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेत छाननी होणार?; आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 11:55 IST2024-12-09T11:53:25+5:302024-12-09T11:55:33+5:30
Ladki Bahin Yojna: राज्यातील २ कोटी ४० लाखांपेक्षा अधिक महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत असून आम्ही सर्व पडताळणी करूनच लाभार्थी महिलांचा या योजनेत समावेश केला आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.

Ladki Bahin Yojna: मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेत छाननी होणार?; आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती
Aditi Tatkare On Ladki Bahin Yojna ( Marathi News ) : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पुढे काय होणार, याबाबत चर्चा रंगत आहे. तसंच या योजनेत छाननी होऊन लाभार्थी महिलांची संख्या कमी होणार का, अशा चर्चांनाही उधाण आले होते. या सर्व चर्चा फेटाळत अशी छाननी करण्याचा सरकारचा विचार नसल्याचे राष्ट्रवादीच्या आमदार आणि माजी मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
"लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये छाननी करण्याचा आमचा कोणताही विचार नाही. याबाबत सुरू असलेली चर्चा चुकीची आहे. कारण आम्ही अतिशय व्यवस्थितरीत्या ही योजना राबवलेली आहे. राज्यातील २ कोटी ४० लाखांपेक्षा अधिक महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत असून आम्ही सर्व पडताळणी करूनच लाभार्थी महिलांचा या योजनेत समावेश केला आहे," अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.
"तक्रार आली तर छाननी"
"एखाद्या बाबतीत तक्रार आली तर छाननी केली जाते. मी महिला आणि बालविकास खात्याची मंत्री असेपर्यंत कोणतीही तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेली नव्हती. आता नव्याने तक्रार आली असेल तर मला त्याबाबत माहिती नाही. पण तक्रारी असतील तरच त्याबाबतीतच छाननी होईल, मोठ्या प्रमाणात या योजनेत छाननी होणार नाही," असंही आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे.
मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर काय म्हणाले होते फडणवीस?
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनीही लाडकी बहीण योजनेबाबत आपली भूमिका मांडली होती. "लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही. ही योजना पुढेदेखील सुरूच ठेवली जाईल. त्यात वाढ करून २१०० रुपये दरमहा दिले जातील. पण त्यासाठी बजेटच्या वेळी आम्ही तसा विचार करू. राज्यातील सर्व आर्थिक स्रोत यांचा अभ्यास करून आणि विचार करूनच अशा प्रकारचे निर्णय घेतले जाऊ शकतात. त्या प्रकारे योग्य पद्धतीने निर्णय केले जातील. २१०० रुपये देण्याचा निर्णय पक्का आहे. जी आश्वासने दिली आहेत, ती नक्कीच पूर्ण करू. त्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी ज्या तरतुदी करण्याची गरज आहे, ती आपण करू आणि जे लोक निकषाच्या आत बसतील, त्यांना योजनांचा लाभ नक्कीच होईल. कोणीही वंचित राहणार नाही. लाडकी बहीण योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याची महायुती सरकारची अजिबातच मानसिकता नाही," असं फडणवीस यांनी म्हटलं होतं.