मोठी बातमी: शरद पवारांना धक्का, महादेव जानकर महायुतीतच राहणार; जागावाटप ठरलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 06:01 PM2024-03-24T18:01:07+5:302024-03-24T18:04:26+5:30
Lok Sabha Election: महायुतीकडून महादेव जानकर यांना लोकसभा निवडणुकीत एक जागा देण्याचं निश्चित करण्यात आलं आहे.
Mahadev Jankar ( Marathi News ) : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे मागील काही दिवसांपासून महायुतीत नाराज होते. जानकर यांनी अनेकदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गाठीभेटीही घेतल्या होत्या. तसंच शरद पवार यांनी मला माढा लोकसभा मतदारसंघाबाबत आश्वासन दिलं असल्याचं सांगत त्यांनी पवारांचे आभार मानले होते. त्यामुळे जानकर हे लवकरच महाविकास आघाडीत सामील होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच आज त्यांनी आपण महायुतीतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. महायुतीकडून जानकर यांना लोकसभा निवडणुकीत एक जागा देण्याचं निश्चित करण्यात आलं आहे.
महादेव जानकर यांच्याशी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर महादेव जानकर यांनी आपण महायुतीसोबतच राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील यावेळी उपस्थित होते.
महादेव जानकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर महायुतीच्या नेत्यांनी एक संयुक्त निवेदन जारी केलं असून त्यामध्ये म्हटलं आहे की, "पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातच देशाचा खऱ्या अर्थाने विकास झालाय आणि त्यांच्या नेतृत्वातच भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल, त्यामुळे आपण मोदीजी यांच्यासोबत आहोत, असं महादेव बैठकीत सांगितलं. या बैठकीत महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला लोकसभेची एक जागा देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण पूर्ण शक्तिनिशी सोबत राहू, असंही महादेव जानकर यांनी यावेळी सांगितलं आहे," असं महायुतीच्या या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. या निवदेनाच्या खाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महादेव जानकर यांचीही सही आहे.
दरम्यान, एकीकडे शरद पवार यांच्यासोबत बैठकांचा सपाटा सुरू असताना महादेव जानकर यांनी अचानक यू-टर्न घेत महायुतीसोबत राहण्याचं पसंत केल्याने महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.