मोठी बातमी! बारामतीत बैठकीत अस्वस्थ वाटू लागल्यानं शरद पवारांचा पुणे दौरा रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 11:41 PM2023-11-11T23:41:24+5:302023-11-11T23:41:44+5:30
शनिवारी शरद पवार बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान इथं बैठकीसाठी गेले होते. त्यावेळी बैठकीत पवारांना अस्वस्थ वाटू लागलं.
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीत बिघाड झाला आहे. बारामतीत एका बैठकीत पवारांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीनं डॉक्टरांना बोलावण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी पवारांची तपासणी करून त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. पवारांच्या प्रकृतीमुळे रविवारी होणारा पुणे दौरा रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शनिवारी शरद पवार बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान इथं बैठकीसाठी गेले होते. त्यावेळी बैठकीत पवारांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर तातडीनं डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. त्यांनी शरद पवारांना तपासून विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे शरद पवार पुणे जिल्ह्यातील पुरंदरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार आहेत.
दिवाळीनिमित्त शरद पवार आणि सर्व कुटुंब बारामतीत आहे. दुपारी २ च्या सुमारास शरद पवार विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीत गेले. तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने सुप्रिया सुळे यांनी डॉक्टरांना बोलावून त्यांची तातडीने वैद्यकीय तपासणी केली. यावेळी शरद पवारांचा ईसीजीही काढण्यात आला आहे. डॉक्टरांच्या टीमने शरद पवारांना विश्रांतीचा सल्ला दिल्याने पुरंदर येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यात ते जाऊ शकणार नाहीत.